गोव्याची विंडसर्फर कात्या कुएल्होला सुवर्ण पदक;
By समीर नाईक | Published: January 21, 2024 04:51 PM2024-01-21T16:51:14+5:302024-01-21T16:51:24+5:30
गोव्याच्या कात्या कुएल्होने मुंबई येथे नुकतेच आयोजित केलेल्या सेल इंडिया नॅशनल २०२४ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले. राज्यासाठी कात्याचे हे १९ वे सुवर्णपदक आहे.
पणजी: गोव्याच्या कात्या कुएल्होने मुंबई येथे नुकतेच आयोजित केलेल्या सेल इंडिया नॅशनल २०२४ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले. राज्यासाठी कात्याचे हे १९ वे सुवर्णपदक आहे.
विंडसर्फर कात्या कुएल्हो, सुमारे गेल्या ७ वर्षांपासून राष्ट्रीय चॅम्पियन आहे. विंडसर्फिंगमधील राष्ट्रीय चॅम्पियन असलेले तिचे वडील डोनाल्ड कुएल्हो, आणि भाऊ डेन कुएल्हो यांना समुद्राच्या लाटा आणि जोरदार वाऱ्यांशी लढताना पाहून कात्याचे विंडसर्फिंगबद्दल प्रेम सुरू झाले. तिच्या वडिलांकडून प्रेरित होऊन, कात्याने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला ज्याने आज तिने खूप उंची गाठली, आणि युवा ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये भारतीय प्रतिनिधित्व करणारी ती पहिली मुलगी बनली आहे.
चीनमध्ये आयोजित युथ ऑलिम्पिक २०१४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली भारतीय मुलगी आणि भारतातील एकमेव सेलर बनली. २०१५ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या ३४व्या सिम ओपन एशियन चॅम्पियनशिपमध्ये १७ वर्षांखालील टेक्नो युवा गटात कांस्यपदक जिंकणारी ती आणि तिचा भाऊ डेन एकमेव भारतीय होते.
जून, जकार्ता इंडोनेशिया आणि आशियाई खेळ २०१८ मध्ये झालेल्या १७ व्या आशियाई सेलिंग चॅम्पियनशिपसाठी ती भारतीय नौकानयन संघाची सदस्य देखील राहिली आहे. गोव्यासाठी देखील आतापर्यंत तिने अनेक पदके मिळवली आहे.