डेन्मार्कच्या इन टू द डार्कनेस या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार
By संदीप आडनाईक | Published: January 24, 2021 10:57 PM2021-01-24T22:57:44+5:302021-01-24T22:58:34+5:30
डेन्मार्कच्या इन टू द डार्कनेस या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटाने रविवारी गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर पुरस्कार पटकाविला.
- संदीप आडनाईक
पणजी - डेन्मार्कच्या इन टू द डार्कनेस या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटाने रविवारी गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर पुरस्कार पटकाविला. तैवानी चेन निएन को यांच्या द सायलेंट फॉरेस्ट या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून, तर याच चित्रपटासाठी त्सु शॉन लिऊ याला उत्कृष्ट अभिनेता तर पोलिश झोफिया स्ताफिज हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कार मिळाला.
गोव्यात बांबोलिम येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर १६ ते २४ जानेवारी या कालावधीत झालेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती प्रसारण विभागाचे सचिव अमित खरे,केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, चित्रपट महोत्सव संचालनालयाचे, महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद आदी उपस्थित होते. अभिनेत्री सिमोन सिंग आणि अभिनेते रवी किशन यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले.
इन टू द डार्कनेस या १५२ मिनिटांच्या डॅनिश चित्रपटाला ४० लाख रुपयांचा हा रोख पुरस्कार दिग्दर्शक अँडर्स रेफन आणि निर्माता लेने बोरग्लम यांना संयुक्तपणे विभागून देण्यात आला आहे. तसेच दोघांना प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. तैवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या चेन-नियन को यांना त्यांच्या २०२० च्या मँड्रिन भाषेतील चित्रपट द साइलेंट फॉरेस्ट साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीच्या रौप्य मयूर पुरस्कारात प्रमाणपत्र आणि १५ लाख रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रौप्य मयूर पुरस्काराने १७ वर्षीय त्सु शॉन लियू याला गौरविण्यात आले. प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा रौप्य मयूर पुरस्कार पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज हिला ''आय नेव्हर क्राय'' या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राप्त झाला आहे. स्टॅफिएजला पुरस्कार स्वरूपात १० लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र मिळाले.
विशेष ज्युरी पुरस्कार बल्गेरियन दिग्दर्शक कामिन कालेव यांच्या सन २०२० मधील ''फेब्रुवारी'' चित्रपटासाठी देण्यात आला आहे. दिग्दर्शक कामिन कालेव यांना रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि १५ लाख रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष उल्लेखनीय पुरस्कार भारतीय दिग्दर्शक कृपाल कलिता यांना त्यांच्या आसामी चित्रपट '' ब्रिज ''साठी प्रदान करण्यात आला आहे. कलिता यांना पुरस्काराच्या रूपात प्रमाणपत्र मिळाले. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार ब्राझीलचे दिग्दर्शक कोसिओ परेरा डॉस सँटोस यांना पोर्तुगिज चित्रपट '' व्हॅलेंटिना '' यासाठी देण्यात आला आहे. शांतता, सहिष्णुता आणि अहिंसा हे महात्मा गांधींचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटासाठी असलेला विशेष आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कार हा अमीन नायफेह यांच्या २०२० मधील '' २०० मीटर '' या अरेबियन चित्रपटाला मिळाला आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर तर अभिनेत्री झीनत अमान यांना जीवन गौरव पुरस्काराने रविवारी गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आले. याशिवाय अभिनेता रवी किशन, राहुल रवैल यांनाही सन्मानित करण्यात आले.
इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात सुवर्ण मयूर पुरस्कार आणि इतर पुरस्कारांसाठी जगातील उत्तम पूर्ण लांबीच्या पंधरा निवडक प्रशंसाप्राप्त चित्रपट सहभागी झाले होते.यामध्ये पोर्तुगालचा द डोमेन, डेन्मार्कचा इन टू द डार्कनेस, बल्गेरिया, फ्रान्सचा फेब्रुवारी, फ्रान्सचा माय बेस्ट पार्ट, पोलंड-आर्यलंडचा आय नेव्हर क्राय, चिलीचा ला वेरोनिका, दक्षिण कोरियाचा लाईट फॉर द युथ, स्पेनचा रेड मून टाइड, इराणचा ड्रीम अबाऊट सोहराब, इराण- अफगाणिस्थानचा द डॉग्ज डिडन्ट स्लिप लास्ट नाईट, तैवानचा द सायलेन्ट फॉरेस्ट, युक्रेन -स्वित्झर्लंडचा द फॉरगॉटन, भारताचा ब्रिज, अ डॉग अँड हिज मॅन आणि तहान यांचा समावेश होता.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात जगभरातील एकूण २२४ चित्रपट दाखवण्यात आले. यावर्षीच्या ह्यकंट्री ऑफ फोकसह्ण असलेल्या बांगलादेशातील सिनेमॅटिक उत्कृष्टता आणि योगदानाची ओळख करून देणारे चित्रपट दाखवले गेले. भारतीय पॅनोरामा विभागात निवडक २३ फिचर आणि २० नॉन-फीचर चित्रपट दाखवले गेले. गोवन चित्रपट एका खास गोवन विभागा अंतर्गत प्रदर्शित केले होते.