गोमेकॉत महिला डॉक्टरची सतावणूक
By admin | Published: July 29, 2016 02:09 AM2016-07-29T02:09:14+5:302016-07-29T02:11:06+5:30
पणजी : गोवा वैद्यकीय माहाविद्यालयात आणखी एका सतावणूक प्रकरणी तक्रार नोंद झाली आहे. शरीरशास्त्राच्या विभाग
पणजी : गोवा वैद्यकीय माहाविद्यालयात आणखी एका सतावणूक प्रकरणी तक्रार नोंद झाली आहे. शरीरशास्त्राच्या विभाग प्रमुखाविरुद्ध गोमेकॉतील एका महिला डॉक्टरने ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात प्राथमिक चौकशीचा अहवाल आरोग्य सचिवांना सादर करण्यात आला आहे.
हा डॉक्टर महिलांना सन्मानजनक वागणूक देत नसल्याच्या तक्रारी होत्या. महिलेने केलेल्या नवीन तक्रारीत या डॉक्टरने आपला छळ केल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही गोमेकॉत छळवणुकीची प्रकरणे घडली होती. तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि चौकशीही झाली होती. महत्त्वाचे म्हणजे ज्या डॉक्टरच्या विरोधात ही नवीन तक्रार करण्यात आली आहे, त्याच्या विरुद्धच अशाच प्रकारची तक्रार यापूर्वीही नोंदविण्यात आली होती. आपल्याच विभागातील एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा त्याच्यावर ठपका होता. सलग दुसऱ्या प्रकरणामुळे हा डॉक्टर अडचणीत आला आहे.
पीडित महिला डॉक्टरने या प्रकरणात गोमेकॉ प्रशासनाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर या प्रकरणात चौकशीही करण्यात आली. चौकशीचा अहवाल गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी आरोग्य खात्याचे अतिरिक्त सचिव आणि गोमेकॉचे प्रशासक सचिन शिंदे यांना सादर केला आहे. गुरुवारी दुपारी आपल्याला हा अहवाल मिळाल्याची माहिती शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभाग प्रमुख म्हणून काम करताना ते आपल्या सहकर्मचाऱ्यांच्या सेवेविषयीच्या गोपनीय अहवालात नकारात्मक गोष्टी लिहितात. अनेक डॉक्टरांच्या तशा तक्रारी आहेत. ते करण्यापूर्वी तसे करीन म्हणून धमकीही देतात. त्यामुळे कर्मचारी त्यांना घाबरतात. महिला कर्मचाऱ्यांची तर गोचीच होते.
गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी सचिवालयात सादर केलेल्या अहवालात या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)