जगभरात स्थायिक झालेले गोमंतकीय फेस्तानिमित्त गोव्यात परतायला सुरूवात, नोव्हेनाला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 01:30 PM2017-11-28T13:30:19+5:302017-11-28T13:30:27+5:30
सेंट झेवियर्स फेस्त हे गोव्यातील ख्रिस्ती धर्मियांचे सर्वात मोठे फेस्ट म्हणजेच जत्रा मानली जाते. फेस्तनिमित्ताने जुनेगोवे येथील प्रसिद्ध चर्चमध्ये नोव्हेनांना (प्रार्थना) आरंभ झाला आहे.
पणजी- सेंट झेवियर्स फेस्त हे गोव्यातील ख्रिस्ती धर्मियांचे सर्वात मोठे फेस्ट म्हणजेच जत्रा मानली जाते. फेस्तनिमित्ताने जुनेगोवे येथील प्रसिद्ध चर्चमध्ये नोव्हेनांना (प्रार्थना) आरंभ झाला आहे. उद्योग-व्यवसायाच्यानिमित्ताने बाहेरगावी गेलेल्या तसंच दुनियेच्या कानाकोपऱ्यात स्थायिक झालेले ख्रिस्ती धर्मिय गोमंतकीय बांधव फेस्तनिमित्ताने गोव्यात परतू लागले आहेत. जुनेगोवे येथे नोव्हेनांसाठी मोठी गर्दी झाल्याचे रोज पहायला मिळते.
नोव्हेंबरच्या अखेरीस गोव्यात फेस्टीव्ह मोसम सुरू होतो. डिसेंबर हा तर पूर्ण फेस्टीव्ह सिझनच असतो. सेंट झेवियर फेस्त आणि नाताळ सणाची धूम डिसेंबर महिना भरून राहते. गोव्यातील लाखो ख्रिस्ती धर्मिय बांधव हे विदेशात कामाधंद्यानिमित्त राहतात. त्यांचे मूळ घर गोव्यात असल्याने वर्षातून म्हणजेच फेस्तवेळी एकदा हे गोमंतकीय आपल्या मूळ घरी परततात. सेंट झेवियर म्हणजेच गोंयचो सायब. या संतावर ख्रिस्ती बांधवांची प्रचंड श्रद्धा आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नोव्हेनांना आरंभ होतो आणि जगात विखुरलेल्या गोमंतकीय ख्रिस्ती बांधवांची पाऊले गोव्याकडे वळू लागतात. सोळाव्या शतकातील चर्चेस जुनेगोवे येथे दिमाखात उभ्या असून एका चर्चमध्ये अजुनही सेंट झेवियरचे शव राखून ठेवण्यात आले आहे. दहा वर्षानी एकदा ते बाहेर काढून ते प्रदर्शनार्थ ठेवले जाते. भाविक त्यावेळी गोंयच्या सायबाचे दर्शन घेतात.
सेंट झेवियरचे भक्त असलेले आणि नोव्हेंनामध्ये भाग घेणारे एक ज्येष्ठ ख्रिस्ती बांधव ट्रोजन डिमेलो यांनी लोकमतला सांगितले, की विदेशात असलेले ख्रिस्ती बांधव फेस्तनिमित्ताने हमखास गोव्यात येतातच. येत्या 4 डिसेंबर रोजी फेस्त साजरे होणार आहे. त्यावेळी जुनेगोवेत अभूतपूर्व गर्दी उसळेल. लाखो भाविक आणि लाखो पर्यटक यानिमित्ताने जुनेगोवे येथील चर्चला भेट देतात. काही ख्रिस्ती बांधव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात दाखल होतील, तर बहुतेकजण आताच गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. काहीजण फेस्त होताच पुन्हा विदेशात परततात तर अनेकजण गोव्यात राहून नाताळ साजरा करतात. नववर्षही साजरे करतात व मग परततात.
जुनेगोवे येथील चर्चच्या परिसरात सध्या मोठा मांडव घालण्यात आला आहे. सुरक्षेच्यादृष्टीने गोवा सरकारने सगळी व्यवस्था केली आहे. जुनेगोवे येथे रोज हजारो पर्यटक सध्या येत आहेत. तेथील अंतर्गत वाहतूक रचना बदलण्यात आली आहे. वाहतूक पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित असले तरी, वाहतुकीचा प्रचंड गोंधळही तिथे अनुभवास येत आहे. कारण रस्त्यांची नीट कल्पना नसल्याने वाहने आत आणणारे पर्यटक गोंधळून गेलेले असतात.