गोमंतकीयानो जागे व्हा: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जबरदस्तीने लादलेले प्रकल्प भविष्यातील पिढ्यांना घातक
By सूरज.नाईकपवार | Published: January 6, 2024 12:27 PM2024-01-06T12:27:08+5:302024-01-06T12:27:53+5:30
गोव्यातील भाजप सरकार भांडवलदारांना खूश करण्यासाठी गोव्याचा नाश करण्याच्या तयारीत आहे.
सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेवर्क, मडगाव: मोपा विमानतळ, आयआयटी, फिल्म सिटी, 3 लिनियर प्रोजेक्ट, स्मार्ट सिटी, थीम पार्क, ओल्ड गोव्यातील घोस्ट घरे,मरिना तसेच जबरदस्तीने लादलेले इतर प्रकल्प आपल्या भावी पिढ्यांना घातक ठरतील. गोमंतकीयांनी आताच शहाणे होवून भाजप सरकारच्या प्रलोभनाला बळी पडू नये. गोंमंतकीयानो जागे व्हा असे आवाहन गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.
दाबोळी विमानतळावरील व्यवसायातील तीव्र घट, जुन्या गोव्यातील घोस्ट घरांना दिलेला क्रमांक, पेडणे येथील थीम पार्कसाठी दिलेली हरित जागा, निसर्गरम्य रिवण आणि काणकोण येथे आयआयटी आणि फिल्म सिटीसाठी दबाव आणण्याचे प्रयत्न, पणजी स्मार्ट सिटीच्या कामाचा गोंधळ अशा अनेक ताज्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आलेमाव यांनी गोमंतकीयांना उठा आणि गोवा वाचवीण्यासाठी पूढे या अशी आर्त हाक दिली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालाशिवाय तसेच गोवा आणि गोमंतकीयांना होणार्या फायदा व नुकसानाचे मूल्यमापन व मूल्यांकन न करता जो प्रकल्प लादला गेला तो विनाशकारीच ठरल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
राज्यातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार म्हणून मागील सरकारने झुआरी अॅग्रो केमिकल्सला प्रचंड जमीन सुपूर्द केली होती. आता सदर जमिनीतील शिल्लक जमिन आता रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते ज्याचा गोमंतकीयांना कोणताही फायदा नाही. या उदाहरणाचा धडा घेवून पूढे पश्चाताप करण्यापेक्षा आताच शहाणे होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
गोव्यातील भाजप सरकार भांडवलदारांना खूश करण्यासाठी गोव्याचा नाश करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरण, जंगले आणि वन्यजीव नष्ट करून गोव्यावर प्रकल्प लादले जात आहेत. कमिशन आणि किकबॅक घेवून खालावलेल्या कामाच्या दर्जाच्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.