गोमंतकीयांची अयोध्येपर्यंत पदयात्रा; साईभक्त परिवाराच्यावतीने ३ जानेवारीपासून आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:17 PM2023-12-06T12:17:51+5:302023-12-06T12:19:09+5:30
३ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या काळात ही पदयात्रा होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाचे औचित्य साधून येथील श्री साई भक्त परिवारातर्फे गोवा ते अयोध्या अशा ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन केले आहे. ३ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या काळात ही पदयात्रा होईल.
गोवा-शिर्डी-शेगाव-बागेश्वर धाम अयोध्या अशी ही पायी वारी होईल. या वारीचे विशेष आकर्षण म्हणजे प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील भव्य राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानिमित मंदिरालाही भेट देणे तसेच त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाईल हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. म्हापसा टॅक्सी स्टॅण्डपासून ३ जानेवारी २०२४ रोजी पदयात्रेला सुरुवात होईल. या दिवशी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते महाआरती होईल. साई भक्त परिवार गेली दहा वर्षे अखंडपणे गोवा ते शिर्डी पायी वारी आयोजित करीत आहे. यंदा वारीचे अकरावे वर्ष आहे. यावर्षी ढोलताशाच्या गजरात व जय साईराम, जय श्रीराम या पवित्र नामघोषात गोवा ते अयोध्या पदयात्रा होईल. यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाचे औचित्य साधून साई भक्त परिवाराने गोवा ते अयोध्या अशा ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पदयात्रेत सहभागी होणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.