गोमंतकीय मुलांचे गणित काही सुटेना; गणितात उत्तीर्ण टक्केवारी कमीच
By वासुदेव.पागी | Published: May 7, 2023 06:34 PM2023-05-07T18:34:19+5:302023-05-07T18:34:39+5:30
गोव्यातील मुलांना गणीत विषय हा अजूनही कठीण जात असल्याचे यंदाच्या बारावीच्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पणजी (गोवा) : गोव्यातील मुलांना गणित विषय हा अजूनही कठीण जात असल्याचे यंदाच्या बारावीच्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कारण या विषयात सर्वात कमी उत्तीर्ण टक्केवारी ९६.१३ इतकी लागली आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांची गणितात कामगिरी सुमार दर्जाची असल्याचे यापूर्वीही राष्टीय स्तरावरील सर्वेक्षणात म्हटले होते.
बारावीला विज्ञान आणि कला विभागात मिळून गणिताचा पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती १०१८४. त्यातील ९७९० विद्यार्थी गणिताला उत्तीर्ण झाले आणि ३९४ विद्यार्थी नापास झाले. ३.८७ टक्के अनुत्तीर्ण प्रमाण आहे. मागील वर्षी हे प्रमाण ३.६२ टक्के इतके होते.
तसेच या विषयात १०० टक्के गुण मिळविणारेही आहेत, परंतु सरासरी उत्तीर्ण टक्केवारीत सुधारणा होताना दिसत नाही. एक वर्षापूर्वी राष्ट्रीय पातळीवरील एका सर्वेक्षण अहवालातही गोव्याचे विद्यार्थी गणितात मागे असल्याचा निश्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे गोव्याची ही प्रतिमा पुसली जाण्यासाठी अजूनही उपाय योजना करण्याची गरज भासते आहे. इतर विषयात कामगिरी समाधानकारक होताना दिसत आहे.
गणिताचाच सख्खा भाऊ असलेल्या सांख्युक (स्टॅटिस्टीक्स) या विषयात मात्र मुले चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. या विषयात ९९.८२ टक्के उत्तीर्ण टक्केवारी आहे. अनुत्तीर्ण टक्केवारी ही ०.८ टक्के इतकी कमी आहे. इतिहास ९७.४० टक्के, राजशास्त्र ९८.३४ टक्के, समाजशास्त्र ९८.१८ टक्के इतकी आहे. भाषा विषयातही कामगिरी समाधानकारक आहे. कोकणी, मराठी आणि हिंदी विषयात अनुक्रमे ९८.०६ टक्के, ९८.४५ टक्के आणि ९८.०९ टक्के इतके उत्तीर्ण प्रमाण आहे. इंग्रजीत ९७.९८ टक्के इतके उत्तीर्ण प्रमाण आहे. जे विषय कमी विद्यार्थी घेतात अशा संस्कृत विषयाला ९८.९० टक्के तर ऊर्दू भाषेला १०० टक्के उत्तीर्ण प्रमाण आहे. तसेच पोर्तुगीज आणि फ्रेंच भाषेलाही उत्तीर्ण टक्केवारी ही ९८.५८ टक्के आणि १०० टक्के अशी आहे.