गोमेकॉत आधार कार्डही नाकारले, रुग्णांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 08:21 PM2018-01-05T20:21:53+5:302018-01-05T20:22:30+5:30
स्थानिक आणि परप्रांतीय अशी रुग्णांमध्ये बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाने (गोमेकॉ) विभागणी केल्यानंतर आता गोमंतकीय रुग्णांकडे तुम्ही ओळखपत्र सादर करा, असा आग्रह गोमेकॉकडून धरला जात आहे
पणजी : स्थानिक आणि परप्रांतीय अशी रुग्णांमध्ये बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाने (गोमेकॉ) विभागणी केल्यानंतर आता गोमंतकीय रुग्णांकडे तुम्ही ओळखपत्र सादर करा, असा आग्रह गोमेकॉकडून धरला जात आहे. अर्थात त्यात काही गैर नाही पण आधार कार्ड हा तुम्ही गोमंतकीय असल्याचे सिद्ध करत नाही असे सांगून गोमेकॉने आधार कार्डही नाकारणो सुरू केले आहे. यामुळे रुग्णांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला आहे.
गोमेकॉवरील रुग्णांचा भार अजुनही कमी झालेला नाही. परप्रांतांमधील रुग्ण शूल्क भरून गोमेकॉत येत आहेत, कारण सिंधुदुर्गात दज्रेदार आरोग्य सुविधाच उपलब्ध नाहीत. गोमेकॉ इस्पितळात परप्रांतीय रुग्णांकडून रोज तीन लाख रुपयांपेक्षा जास्त शुल्क गोळा होत आहे. गोमेकॉत रुग्ण नोंदणी शुल्कात थोडी वाढ करण्यात आली आहे. परप्रांतीय रुग्णांना एका दिवसासाठी एका खाटच्या वापरासाठी पन्नास रुपयांचे शूल्क द्यावे लागत आहे. ते दिले जात आहे.
गोव्याच्या ग्रामीण भागात अनेक लोक असे आहेत, त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे ओळखपत्र नाही. वयोवृद्धांकडे अनेकदा ओळखपत्र असत नाही. काहीवेळा गोमेकॉत येताना लोक ओळखीचा पुरावा घेऊनयेत नाहीत. अशा गोमंतकीय रुग्णांना गोमेकॉच्या व्यवस्थापनाकडून उपचार नाकारले जात असल्याने अशा रुग्णांचा डॉक्टरांशी संघर्ष होऊ लागला आहे. काही गोमंतकीय रुग्णांकडे आधार कार्ड हाज एक पुरावा असतो, सर्वाचीच नोंदणी दिनदयाळ स्वास्थ्य विमा योजनेखाली अजून झालेली नाही. त्यामुळे सगळ्य़ांकडेच ते कार्ड नाही. आधार कार्डही नाकारले जात असल्याने रुग्ण मग उपचारांसाठी डॉक्टरांकडे गयावया करतात, विनवण्या करतात. या स्थितीवर सरकारने तातडीने उपाय काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
आधार कार्ड हे कुणाही मिळते, ते केवळ गोमंतकीयांनाच मिळते असे नाही पण आधार कार्डवर व्यक्तींचा पत्ता लिहिलेला असतो. कोण कुठच्या गावचे हे आधार कार्डद्वारे कळत असते. त्यामुळे आधार कार्ड स्वीकारले जायला हवे, अशा प्रकारची मागणी होत आहे. गोव्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती गोव्यातच मतदान करत असते. मात्र आधार कार्ड दाखवून त्या व्यक्तीला गोमेकॉत जर मोफत उपचार मिळणार नसतील तर कसे होईल असा प्रश्न करून काही रुग्ण गोमेकॉत सध्या नाईलाजाने भांडणही करत असल्याचे आढळून येत आहे. काही डॉक्टरही या प्रकारांमुळे हैराण होऊ लागले आहेत.