गोमेकॉत ऑक्सिजनचा तुटवडा : डीन बांदेकर यांची कबुली, खंडपीठाने सरकारला खडसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:38 AM2021-05-13T07:38:45+5:302021-05-13T07:41:25+5:30
कोविडमुळे लोक आजारी पडत असले तरी ऑक्सिजनअभावी ते मृत पावतात, ही गोमेकॉतील धक्कादायक वस्तुस्थिती न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे उघड झाली.
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याची स्पष्ट कबुली गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर दिली. हाय फ्लो नेसल उपकरणाद्वारे ऑक्सिजनचा (एचएफएनओ) पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. परंतु त्याद्वारे अधिक ऑक्सिजन जात असल्यामुळे ते वापरले जात नाही, अशी धक्कादायक माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे गोमेकॉत दररोज ५० हून अधिक रुग्ण का मृत पावतात, याचा उलगडा झाला.
कोविडमुळे लोक आजारी पडत असले तरी ऑक्सिजनअभावी ते मृत पावतात, ही गोमेकॉतील धक्कादायक वस्तुस्थिती न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे उघड झाली. मंगळवारी गोमेकॉत तब्बल ४०० ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासल्याची माहिती गोमेकॉच्या नोडल अधिकाऱ्यांनी खंडपीठाला दिली. गोमेकॉत एकूण ३२० रुग्ण हे सिलिंडरमधील ऑक्सिजनवर होते, तर १६० रुग्ण हे पाईपलाईनद्वारे सुरू असलेल्या ऑक्सिजनवर होते, असे या अधिकाऱ्यांनी खंडपीठाला सांगितले. गोमेकॉला दर दिवसा ५०० सिलिंडरची आवश्यकता भासत असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोमेकॉतील ऑक्सिजनची गरज आणि होणारा पुरवठा याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा आदेश खंडपीठाने गोमेकॉला दिला होता. बुधवारपर्यंत याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आवश्यकता होती. परंतु गोमेकॉने याविषयी प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे खंडपीठाने या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतली आणि आताच्या आता गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी एका वकिलामार्फत डॉ. बांदेकर यांना तात्काळ संपर्क करण्यास सांगितले.
बस्स करा हे आता... न्यायालयाने सुनावले
यावेळी सरकारच्या एकंदरीतच कारभारावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कधी म्हणता ऑक्सिजन आवश्यक प्रमाणात आहे; पण रिकामे सिलिंडर नाहीत. रिकामे सिलिंडर्स आणून दिल्यास सांगता ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात नाही. बस्स करा हे आता... अशा शब्दांत न्यायमूर्ती महेश सोनक आणि नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने सरकारला खडसावले.
७२ ट्रॉली पुरविणे अशक्य
गोमेकॉला दरदिवसा जवळपास ५०० सिलिंडरची म्हणजेच सुमारे ७२ ट्रॉलींची आवश्यकता आहे. इतका पुरवठा करण्याबाबत महसूल सचिवांनी न्यायालयात असमर्थता व्यक्त केली.
आज रात्री काळजी घ्या....
बुधवारी आणि गुरुवारी रात्री ऑक्सिजनअभावी कुणीही मरणार नाही याची खात्री घ्यावी, असा आदेश खंडपीठाने गोमेकॉला दिला. हा परीक्षेचा काळ असल्याचेही खंडपीठाने गोमेकॉला बजावले आहे.
म्हणून रुग्ण मरतात
रात्री २ ते ६ या वेळेतच रुग्ण अधिक प्रमाणात का दगावतात? असा प्रश्न खंडपीठाने गोमेकॉच्या डॉक्टरांना केला. त्यावेळी डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले, ते असे: ‘पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेल्या रुग्णांची प्रकृतीही फार नाजूक असते. या रुग्णांना ऑक्सिजनचा सतत पुरवठा हवा असतो. एचएफएनओची व्यवस्था आहे. परंतु त्यामुळे ऑक्सिजन अधिक प्रमाणात लागत असल्यामुळे ती यंत्रणा वापरली जात नाही.’