आनंदाची बातमी; दोन वषार्नंतर पुन्हा एकदा दाबोळी विमानतळावर उतरले विदेशी चार्टर विमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 06:36 PM2021-12-15T18:36:58+5:302021-12-15T18:37:05+5:30
दोन वषार्नंतर दाबोळीवर पहीले विदेशी चार्टर पर्यटकांना घेऊन बुधवारी सकाळी येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता.
वास्को: कोवीड महामारीनंतर तब्बल दोन वर्षानी बुधवारी (दि.१५) सकाळी गोव्याच्या दाबोळी विमानतळावर १५९ विदेशी पर्यटकांना घेऊन ‘एअर अस्ताना’ चे पहीले चार्टर विमान उतरले. दोन वर्षानंतर पहील्या विदेशी चार्टर विमानाने गोव्यात दाखल झालेल्या अलमाटी, कझाकस्तान येथील विदेशी पर्यटकांचे दाबोळी विमानतळावर पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांच्यासहीत इतर मान्यवरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
दोन वषार्नंतर दाबोळीवर पहीले विदेशी चार्टर पर्यटकांना घेऊन बुधवारी सकाळी येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. विदेशी पर्यटकांच्या स्वागतासाठी आयोजित खास कार्यक्रमात पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो, दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक, गोवा पर्यटन विभागाच्या चित्रा वेंगुर्लेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ‘एअर अस्ताना’ चे चार्टर विमान दाबोळीवर दोन वषार्नंतर विदेशी पर्यटकांना घेऊन उतरल्यानंतर पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांच्यासहीत इतर मान्यवरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. स्वागत कार्यक्रमानंतर बोलताना मावीन गुदिन्हो यांनी आजचा दिवस गोव्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी मोठा आनंदाचा दिवस असल्याचे सांगितले.
कोविड महामारीनंतर तब्बल दोन वर्षे गोव्यात येणारी विदेशी चार्टर विमाने बंद असल्याने आर्थिक रित्या गोव्याला याचे मोठे नुकसान सोसावे लागले होते. दाबोळीवर पहीले विदेशी चार्टर विमान उतरलेले असून येणाºया दिवसात विविध देशातून अन्य ४० विदेशी चार्टर विमाने गोव्यात येणार असल्याचे अजूनपर्यंत निश्चित झाले आहे. विदेशी पर्यटकांचे गोव्यात स्वागत करण्याबरोबरच कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी येथे सर्व प्रकारच्या खबरदारी बाळगल्या जात असल्याची माहीती गुदिन्हो यांनी दिली. पर्यटन क्षेत्र गोव्याचा एक महत्वपूर्ण भाग असून पुन्हा एकदा विदेशी चार्टर विमाने यायला सुरू झाल्याने गोव्यासाठी खरोखरच ही एक आनंदाची गोष्ट असल्याचे गुदिन्हो शेवटी म्हणाले.
दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी अजूनपर्यंत विमानतळ प्राधिकरणाने तीन विदेशी चार्टर विमानांना गोव्यात विदेशी पर्यटकांना घेऊन येण्याची परवानगी दिल्याची माहीती दिली. त्या तीनही चार्टर कंपन्यांना विदेशी पर्यटकांना घेऊन येण्याचे ४० ‘स्लोट’ मंजूर केलेले आहेत. भविष्यात अन्य चार्टर कंपन्यांनाही विदेशी पर्यटकांना घेऊन येण्याची परवानगी मागितल्यानंतर सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्यांनाही परवानगी दिली जाणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. दाबोळीवर दोन वर्षानंतर पहीले चार्टर विमान आलेले असून भविष्यात विदेशी पर्यटकांच्या येण्याच्या संख्येत आणखीन चांगली वाढ होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोना महामारीपूर्वी दाबोळीवर येणाऱ्या राष्ट्रीय विमानांची संख्या आम्ही पार केलेली असून गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक येत आहेत. गेल्या आठवड्यात एकाच दिवसाला देशातील विविध भागातून दाबोळीवर ९५ विमाने आलेली असून कोरोनापूर्वी सुद्धा एवढी विमाने दाबोळीवर हाताळण्यात आलेली नसल्याचे मलिक यांनी सांगितले. दाबोळीवर विदेशी आणि देशी पर्यटक- प्रवाशांना हाताळताना कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सर्व खबरदारी बाळगल्या जात असल्याचे मलिक यांनी माहीतीत शेवटी सांगितले. दाबोळीवर उतरलेल्या चार्टर विमानाची कंपनी एप्रिल महीन्यापर्यंत गोव्यात चार्टर विमानाने विदेशी पर्यटकांना घेऊन येणार असून दर आठवड्याला तीन विमानाने सुमारे ५०० विदेशी पर्यटकांना घेऊन येणार असल्याची माहीती याप्रसंगी देण्यात आली.