दहावीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर; गणित, विज्ञान पेपर सोडवण्यास १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:15 PM2023-02-18T13:15:45+5:302023-02-18T13:16:58+5:30
मागील वर्षीही दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित पेपर सोडविण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी असून, गणित आणि विज्ञान परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना यंदाही १५ मिनिटे अधिक देण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला आहे. मागील वर्षीही दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित पेपर सोडविण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला होता. यंदा केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांनाच अधिक वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.
यंदा केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच ही सवलत असेल. तीही गणित आणि विज्ञान विषयासाठी असेल. गणित व विज्ञानच्या पेपरासाठी दीड तास म्हणजे ९० मिनिटे दिली जातात. यावेळी ती १०५ मिनिटे दिली जातील. राष्ट्रीय सर्वेक्षणात गोव्यातील विद्यार्थी गणित विषयात मागे पडत असल्याचा निकष आल्यानंतर शालान्त मंडळाने हा निर्णय घेतला होता. तसेच मागील वर्षी कोविडमुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ग झाले नव्हते. त्यामुळेही अधिक वेळ देण्यात आला होता. प्रथम सत्र परीक्षा ही केवळ पर्याय निवडून लिहिण्याची, म्हणजेच एमसीक्यू पद्धतीने लिहिण्याची होती. त्यामुळे अधिक वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. ही परीक्षा ही उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिण्याची आणि गणिते सोडविण्याची आहे. त्यामुळे अधिक वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर १५ मिनिटे अतिरिक्त वेळ देण्याची सवलत देणारे हे शेवटचे वर्ष आहे. यापुढे ती दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दहावीच्या द्वितीय सत्र परीक्षा १ एप्रिलपासून सुरू होत आहेत. तर बारावीच्या १५ मार्चपासून सुरू होत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापूर्वीच दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याचा शालान्त मंडळाचा यंदा इरादा आहे.
शारीरिक शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण पर्यायी विषय
इयत्ता नववी ते १२वीपर्यंतच्या अभ्याक्रमात शारीरिक शिक्षण व शिक्षक प्रशिक्षण या पर्यायी विषयात वाढ करण्याचा शालान्त मंडळाचा प्रस्ताव आहे. त्यानुसार यापैकी कोणताही एक विषय विद्यार्थ्यांना सातवा विषय म्हणून घेता येईल. म्हणजेच, एकूण सात विषयांपैकी कोणत्याही सहा विषयांत विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर तो उत्तीर्ण असे धरले जावे, असा हा प्रस्ताव आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार की नाही हे काही सांगता येत नाही. परंतु, पर्यायी विषय अभ्यासक्रमात जोडण्यासाठी प्रयत्न जोरात चालू आहेत, असे शेट्ये यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"