आमदारांसाठी गुड न्यूज? मंत्रिपदांकडे लागले डोळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 01:43 PM2024-06-25T13:43:16+5:302024-06-25T13:44:37+5:30
मुख्यमंत्री गोव्यात परतल्यानंतर काही आमदार त्यांना भेटून आपल्या मंत्रिपदाविषयी विचारण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी तीन दिवसांचा आपला दिल्ली दौरा काल रात्री संपवला, गोव्यातील काही भाजप आमदार मंत्रिपदाची गुड न्यूज ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत. मुख्यमंत्री गोव्यात परतल्यानंतर काही आमदार त्यांना भेटून आपल्या मंत्रिपदाविषयी विचारण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर गोवा प्रदेश भाजपने मुख्यमंत्र्यांना कोणताही कडक निर्णय तुम्ही घ्या, अशा शब्दांत सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. काही मंत्र्यांची खाती बदलायची असतील किंवा एक-दोन आमदारांना मंत्रिपदे द्यायची असतील तर त्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने मुख्यमंत्र्यांकडेच सोपवले आहेत. अर्थात, असा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतोच पण सावंत है यापूर्वी निर्णय स्वतः घेण्याचा धोका पत्करत नव्हते. मुख्यमंत्र्यांची काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याशी चर्चा झाली आहे.
काही आमदारांना मंत्रिपदे हवी आहेत. काही मंत्री भाजपमध्ये असले तरी, ते भाजपचे काम नेटाने करत नाहीत, अशी चर्चा पक्षाच्या आतील गोटात आहे. एक-दोन आमदारांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ फेररचनेविषयी चर्चा केल्याची माहिती मिळाली. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशीही चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.