गोव्यातील सरकारी इस्पितळांच्या आयसीयूचं होणार आऊटसोर्सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 10:14 AM2017-11-10T10:14:03+5:302017-11-10T10:14:25+5:30
पणजी- गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन (गोमेकॉ) इस्पितळासह सर्व सरकारी इस्पितळांमधील अतिदक्षता विभागांचे व्यवस्थापन हे यापुढे आऊटसोर्स करावे, असे आरोग्य खात्याने ठरवले आहे.
आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे. गोमेकॉ इस्पितळासह जिल्हा इस्पितळांमध्ये आयसीयू आहे पण काही इस्पितळांमधील आयसीयू चालतच नाही. यासाठी व्यवस्थापन तेवढे वैद्यकीय क्षेत्रातील बड्या व अनुभवी कंपन्यांकडे सोपविले जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
साखळी आणि वाळपई येथील सरकारी इस्पितळांमध्ये शस्त्रक्रिया विभाग आहेत. पाच वर्षांपूर्वी हे विभाग बांधले गेले पण ते सुरूच झाले नाही. आता तिथे आवश्यक डॉक्टर्स, शल्यविशारद आणि अन्य मनुष्यबळ नियुक्त केले जाईल व हे शस्त्रक्रिया विभाग सुरू केले जातील. येत्या 30 डिसेंबरपर्यंत या विभागांमध्ये लहान शस्त्रक्रिया सुरू होतील असे मंत्री राणे यांनी सांगितले. आपण वाळपई इस्पितळाला भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गोव्यातील सरकारी इस्पितळांमध्ये परप्रांतीय रुग्णांकडून शूल्क आकारण्याच्या निर्णयाशी सरकार ठाम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलही रुग्णांना थोडे तरी शूल्क उपचारांसाठी द्यावेच लागेल असे मंत्री राणे यांनी सांगितले.
परप्रांतांमधून 30 टक्के रूग्ण गोव्यात उपचारासाठी येतात. हृदयरोगविषयक महागडे उपचार त्यांना गोव्यात मोफत मिळतात. थोडे तरी शुल्क येत्या दि. 1 डिसेंबरपासून परप्रांतीय रुग्णांकडून आकारले जाईल असे राणे यांनी सांगितले