गोव्यात मोदींच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांची लगीनघाई
By किशोर कुबल | Published: February 4, 2024 10:10 PM2024-02-04T22:10:19+5:302024-02-04T22:10:40+5:30
मंगळवारी मडगाव येथे सभा : चार सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी, प्रचाराचाही नारळ फोडणार
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी ६ रोजी गोवा दौय्रावर येत असून बेतुल येथे ‘इंडिया एनर्जी वीक’चे उद्घाटन व मडगांव येथे जाहीर सभा असे त्यांचे दोन कार्यक्रम होणार आहेत. सभेला अवघेच काही तास राहिल्याने सरकारी यंत्रणांची लगीनघाई चालली आहे.
लोकसभा निवडणूक जवळ आल्याने मोदी या जाहीर सभेत भाजपसाठी प्रचाराचा नारळ फोडतील. सभेला ५० हजार लोकांची उपस्थिती लाभेल , असे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले आहे. मंडल अध्यक्ष, आमदार, पदाधिकारी यांच्यावर लोक आणण्याची जबाबदारी सोपवली आहे.
जाहीर सभेत पंतप्रधानांच्या चार वेगवेगळ्या सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन आणि तीन प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. कुंकळ्ळी येथे एनआयटी, दोनापॉल येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, बेती येथे आयएनएस मांडवी नेव्हल वॉर कॉलेजचे नवीन कॅम्पस आणि कुडचडें कचरा प्रकल्पाचे वर्चुअल पद्धतीने ते उद्घाटन करतील तसेच रेइश मागुश येथे पीपीपी तत्वावर यु घातलेला रोपवे प्रकल्प, पाटो, पणजी येथे थ्री डी-प्रिंटेड इमारत आणि शेळपें, साळावली येथे १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्या हस्ते व्हर्चुअल पध्दतीनेच होणार आहे.
जाहीर सभेवेळी मुख्यमंत्री गेल्या दहा वर्षातील विकासकामांचा रिपोर्ट मोदींना देतील तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या काही सरकारी अधिकाय्रांना मोदींहस्ते सन्मानित केले जाईल. तत्पूर्वी बेतुल येथे ‘इंडिया एनर्जी वीक’चे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल. तीन दिवस चालणार असलेल्या या परिषदेत १७ देशांचे ऊर्जामंत्री व ३५ हजार प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, सध्या विधानसभा अधिवेशन चालू असून मोदींच्या सभेमुळे उद्या मंगळवारी कामकाज होणार नाही. त्याऐवजी शनिवारी १० रोजी कामकाज ठेवण्यात आले आहे. जाहीर सभेच्यावेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी उद्या मंगळवारी मडगांव शहरातील विद्यायलांना शिक्षण खात्याने सुट्टी जाहीर केली आहे. बेतुल, मडगांव व परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून छावणीचे स्वरुप येईल.