असंघटितपणामुळे सरकार पडू शकते - विजय सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:42 PM2019-02-06T18:42:33+5:302019-02-06T18:43:55+5:30
असंघटितपणावर उपाय काढला नाही तर सरकार पडू शकते, असा इशारा भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी येथे दिला.
पणजी : विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात शिरोडय़ातून भाजपाविरोधात मगो पक्ष रिंगणात उतरतोय. यावरून सत्ताधारी आघाडीत असंघटितपणा असल्याचा संदेश बाहेर जातो. असंघटितपणावर उपाय काढला नाही तर सरकार पडू शकते, असा इशारा भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी येथे दिला.
पत्रकारांशी बोलताना मंत्री सरदेसाई म्हणाले, की आमच्याकडे सरकार वाचविण्यासाठी सगळा बी प्लॅन तयार आहे पण सत्ताधारी आघाडीतील एक पक्ष दुस-या पक्षाविरोधात पोटनिवडणूक लढवतोय हे मला पटत नाही. मैत्रीपूर्ण लढत असे कुठेच कधी असत नाही. मी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोरही हा विषय मांडला व त्यांना देखील हा काय प्रकार आहे, हे विचारले. मात्र, मुख्यमंत्र्यांकडेही त्याचे उत्तर नाही, असे मला दिसून आले. त्यांनाही हे कोडे समजलेले नाही. परंतू मनोहर पर्रीकर आजारातून थोडे बरे होऊन आल्यानंतर त्यांना या विषयाकडे लक्ष द्यावे लागेल.
मंत्री सरदेसाई म्हणाले, की सत्ताधारी आघाडीत जर असंघटीतपणा राहिला तर सरकार अस्थिर आहे असे लोक समजतील. असंघटितपणामुळे सरकार पडूही शकते. आम्हाला बी प्लॅन तयार करावाच लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्थिती स्पष्ट करायला हवी. सरकारमध्ये राहून एक घटक पक्ष दुस-या पक्षाविरुद्ध लढू शकतच नाही.
सरकार स्थिर : दिपक
मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, सत्ताधारी आघाडीकडे एकूण 23 आमदार आहेत. त्यामुळे सरकार स्थिर आहे. मगो पक्ष काही सरकारमधून बाहेर जात नाही. त्यामुळे सरकार पडणार नाही. सरकार पडण्यासाठी मगोप किंवा फॉरवर्ड यापैकी एका पक्षाला सत्तेबाहेर जावे लागेल. आम्ही तरी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आहोत व बाहेर जाण्याचा विचार नाही.