राष्ट्रीय क्रीडा दिनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली फिट राहण्याची प्रतिज्ञा
By समीर नाईक | Published: August 29, 2023 03:52 PM2023-08-29T15:52:57+5:302023-08-29T15:53:20+5:30
देशभर मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला
समीर नाईक, पणजी: राज्यात मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सर्व सरकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी फिट इंडिया उपक्रमा अंतर्गत स्वत:ह फिट राहण्याची आणि देशाला फिट ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली. खाते प्रमुखांनीच आपापल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची प्रतिज्ञा दिली. देशभर मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यातील सर्व सरकारी खात्यांच्या कर्मचाऱ्यांनी क्रीडा पोशाखात कार्यालयात हजर राहावे आणि फिट इंडिया उपक्रमांतर्गत त्यांनी प्रतीज्ञा घ्यावी, असा आदेश क्रीडा खात्यातर्फे सर्व सरकारी खातेप्रमुखांना काढला होता. या पार्श्वभूमीवर ही प्रतिज्ञा घेण्यात आली.
जरी क्रीडा पोशाखात कार्यालयात हजर राहावे असा आदेश देण्यात असला, तरी बहुतांश कर्मचारी आपल्या नेहमीच्या पोशाखातच कार्यालयात हजर होते. एक दिवस आधीच आदेश जारी करण्यात आल्याने एैनवेळी अनेकांना क्रीडा पोशाखाची व्यावस्था करणे जमले नाही, असे कळाले आहे.
क्रीडा सचिव स्वेतिका सच्चान यांनी हा आदेश जारी केला होता. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केली जाते. याचे औचित्य साधून केंद्रीय क्रीडा व युवा व्यावहार खात्यातर्फे सर्व राज्यांना सरकारी खात्यात क्रीडा दिन साजरा करण्याची सूचना करण्यात आली होती. या आदेशाची अंमलबजावणी राज्यातही गाेवा क्रीडा आणि युवा व्यावहार खात्यातर्फे करण्यात आली.
अशी होती प्रतिज्ञा...
मी शपथ घेतो, की सक्रिय आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी मी सदैव अग्रेसर असणार. माझ्या फिटनेस आणि आरोग्यासाठी दररोज ३० मिनिटे वेळ काढेन. माझ्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांना तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहित करेन. व फिटनेस चाचणीचे फिट इंडिया मोबाइल ॲपवर नियमितपणे मूल्यांकन करणार, अशी प्रतिज्ञा कर्मचाऱ्यांनी घेतली.