सरकार जनतेच्या भल्यासाठीच आहे, विकास कामांना विरोध करू नका : मंत्री गोविंद गावडे
By आप्पा बुवा | Published: April 11, 2023 07:08 PM2023-04-11T19:08:13+5:302023-04-11T19:08:20+5:30
फोंडा - प्रत्येक घरी , प्रत्येक दारात रस्ता व घरोघर सुरळीत वीज हे स्वप्न घेऊन मी प्रियोळच्या राजकारणात शिरलो असून, ...
फोंडा - प्रत्येक घरी , प्रत्येक दारात रस्ता व घरोघर सुरळीत वीज हे स्वप्न घेऊन मी प्रियोळच्या राजकारणात शिरलो असून, मागच्या सहा वर्षाचा आढावा घेतला असता साधन सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीत आम्ही खूप पुढे येऊन पोहोचलेलो आहोत. दिलेल्या मुदतीच्या आज आम्ही कामे पूर्ण करत आहोत. आम्हाला अजूनही खूप काही करायचे आहे. तेव्हा जनतेने आम्हाला सहकार्य करावे. असे आवाहन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले.
कंगवाळ टाकी ते वळवई, सावईवेरे इत्यादी भागात पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीचा शुभारंभ मंगळवारी त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी स्थानिक सरपंच शोभा पेरणी, वेलिंगच्या सरपंच हर्षा गावडे, वळवईचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर, बेतकी खांडोळाचे सरपंच जयेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य प्रिया चारी,श्रमेश भोसले, माजी सरपंच सत्यवान शिलकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते .
यावेळी पुढे बोलताना गोविंद गावडे म्हणाले की 'आमचे सरकार सर्वांच्या भल्याचा विचार करत आहे . प्रत्येक घरात पाणी असणे आज गरजेचे आहे. परंतु जलवाहिन्या टाकताना काही लोक मुद्दाम राजकारण करतात. जागा देताना सहकार्य करत नाहीत. एक इवलीशी जल वाहिनी तुमच्या जमिनीतून गेल्यास तुमचे काही नुकसान होणार नाही. परंतु तुमच्या औदर्यातून उंचवट्यावर असलेल्या डोंगराळ भागातील लोकांना पाणी मिळेल याचा विचार करा. इथे येताना कोणीच जमीन घेऊन येत नाही. जमीन हि नैसर्गिक आहे. आम्ही फक्त त्या जमिनीचे राखणदार आहोत हा विचार मनात बिंबवा. सरकार एकटे काही करू शकणार नाही. जिथे गरज असेल तिथे जनतेने सुद्धा तेवढेच सहकार्य करायला हवे.
माझ्या मतदारसंघाचा विचार करता पाण्याच्या अभावी महिलांच्या डोळ्यात अश्रू येत होते. दिवसभर काबाडकष्ट करायचे व रात्री पाण्यासाठी रात्री जागवायच्या यामुळे इथल्या महिला हैराण झाल्या होत्या. पहिल्या दिवसापासून पाण्यासाठी आम्ही मेहनत घेतली. आज ज्या तऱ्हेने काम चालू आहे ते पाहता आगामी काळात इथल्या महिलेच्या डोळ्यात पाणी नसणार तर त्यांच्या घरात पाणी असणार. ह्याची काळजी आम्ही घेतलेली आहे. आमच्या भागात मोठ्या प्रमाणावर बागायती व नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या साधन संपत्तीचा कसा वापर करता येईल यासाठी आराखडे बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पर्यटन स्थळे वाढल्यास लोकांच्या घरात महसूल येईल, त्याचबरोबर रोजगार निर्माण होईल.
सत्यवान शिलकर,प्रिया चारी, श्रमेश भोसले यांची सुद्धा यावेळी समयोचित भाषणे झाली.