कोविडबाबत सरकारी सुविधा उत्तमच- विश्वजित राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:34 PM2020-08-28T15:34:23+5:302020-08-28T15:35:46+5:30
बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात आणखी तीन नवे विभाग तयार; राणेंची माहिती
पणजी : कोविड व्यवस्थापनासाठी सरकारने ज्या आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत, त्या उत्तमच आहेत. त्याविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारणच नाही असे निवेदन आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी येथे लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी केले.
सोशल मिडियावरून काहीजण सरकारी आरोग्य सुविधांविषयी प्रश्न निर्माण करत आहेत, त्याविषयी बोलताना मंत्री राणे म्हणाले, की सरकारने सर्वप्रथम मडगाव येथे ईएसआय इस्पितळचे रुपांतर कोविड इस्पितळात केले. तिथे आतार्पयत मोठ्या संख्येने कोविडग्रस्तांवर उपचार झाले. शेकडो कोविडग्रस्त आजारातून बरेही झाले. ज्यांना को-मॉर्बिडीटी म्हणजे एकापेक्षा जास्त आजार होते, त्यापैकी काही ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. काही अन्य रुग्णही दगावले. यामुळे आम्ही बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात आणखी तीन नवे विभाग तयार केले आहेत.
मंत्री राणे म्हणाले, की आम्ही गोमेकॉतील तिन्ही विभाग सक्रिय केले आहेत. एका विभागाचे अगोदर रंगकाम झाले नव्हते. त्यामुळे अगोदर दोन विभाग सुरू झाले. रंगकामही करून घेतले व तिसरा विभाग सुरू झाला. ज्यांना कोविडसह अन्य विविध प्रकारचे आजार अगोदरपासून आहेत, त्यांच्यावर या विभागांमध्ये उपचार केले जातात. विविध रुग्ण तिथे ठेवले गेले आहेत. काहीजणांना अनेक वर्षे डायबेटीस असतो, उच्च रक्तदाबाची व्याधी असते किंवा अन्य आजार असतात व त्यात पुन्हा कोविडची लागण झालेली असते, अशा रुग्णांवर या तीन विभागांमध्ये उपचार केले जात आहेत.
मंत्री राणे म्हणाले, की सरकारने आरोग्य क्षेत्रात कमी कालावधीत चांगल्या सुविधा निर्माण केल्या. चांगले डॉक्टर्स आमच्याकडे आहेत. आपण सरकारी सुविधांविषयीचे फोटो कुणालाही दाखविण्यास तयार आहे. कोविड येण्यापूर्वी आमच्याकडे एकही प्रयोगशाळा नव्हती, कोविड चाचणीसाठी नमुने पुणे येथे पाठवावे लागत होते. आम्ही प्रयोगशाळेचीही निर्मिती केली.