कर्नाटकमधून वीज घेणे सरकारने थांबविले, दक्षिण गोव्याला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 07:57 PM2019-06-17T19:57:08+5:302019-06-17T19:57:28+5:30
कर्नाटकमधून जी वीज वाहिनी दक्षिण ग्रीडची वीज घेऊन गोव्यात येते, ती वाहिनी घनदाट जंगल क्षेत्रातून तसेच अनमोड, मोले अशा घाटांतून येते. दऱ्यांमधून वीज वाहिनी येते.
पणजी : कर्नाटकमधून म्हणजेच दक्षिण ग्रीडच्या माध्यमातून गोव्याला एवढी वर्षे जी वीज यायची, ती वीज स्वीकारणे गोवा सरकारने सोमवारपासून थांबविले आहे. आता पश्चिम ग्रीडमधून म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेहून दक्षिण गोव्याला वीज पुरवठा होईल. दक्षिण गोव्यातील लोकांना भेडसावणारी वीज समस्या यामुळे सुटेल, असा विश्वास वीजमंत्री निलेश काब्राल यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कर्नाटकमधून जी वीज वाहिनी दक्षिण ग्रीडची वीज घेऊन गोव्यात येते, ती वाहिनी घनदाट जंगल क्षेत्रातून तसेच अनमोड, मोले अशा घाटांतून येते. दऱ्यांमधून वीज वाहिनी येते. पावसाळ्य़ात झाडे पडतात तसेच उंच बांबूही त्या वीज वाहिन्यांना येऊन टेकतात आणि वारंवार वीजेची समस्या निर्माण होते. ती समस्या आम्ही त्वरित दूर करू शकत नाही, कारण अनेकदा कर्नाटकमध्ये वीज वाहिनीला समस्या आलेली असते. कर्नाटकच्याच यंत्रणेने ती समस्या दूर करावी लागते. पण त्यासाठीही कर्नाटकच्या यंत्रणेला जेव्हा वेळ मिळतो तेव्हाच ती यंत्रणा ते काम करू शकते. आम्ही त्यांना आदेश देऊ शकत नाही, असे मंत्री काब्राल म्हणाले.
देशभर एकच राष्ट्रीय ग्रीड आहे. तिथूनच पूर्ण देशाला वीजेचा पुरवठा होतो. आम्ही सगळे सोपस्कार पार पाडले व कर्नाटमधून येणारी वीज थांबवली आहे. पश्चिम ग्रीडमधून उत्तर गोव्याला वीज येते. हीच वीज दक्षिण गोव्यालाही येईल. धारबांदोडय़ाला पुढील तीन-चार वर्षात 40 केव्ही क्षमतेचे नवे मोठे वीजउपकेंद्र उभे केले जाईल. तिथे एक लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन घेतलेली आहे. एकदा ते केंद्र उभे राहिल्यानंतर मग कर्नाटकमधील वीज पुरवठा आम्ही पुन्हा स्वीकारू, असेही काब्राल यांनी जाहीर केले.
लोकांनी त्याग करावा
गोव्याला 1 हजार मेगावॅट वीज मिळते. आम्ही फक्त 650 मेगावॅट एवढीच वीज वापरू शकतो. कारण वीज वितरणाचे जाळे आमच्याकडे नाही. ते जाळे उभे करण्यासाठी आवश्यक सुधारणा आम्ही करणार आहोत. आमच्याकडे वीज कमी नाही. चोवीस तास पूर्ण गोव्याला वीज देता येते. मात्र सुधारणा व्हायच्या असेल व लोकांना अखंडीतपणे वीज हवी असेल तर लोकांना थोडा त्याग करावा लागेल, असा सल्ला काब्राल यांनी दिला. हा त्याग कोणता तेही त्यांनी सांगितले. ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी लोकांनी थोडी तरी जमीन उपलब्ध करून द्यायला हवी. वीज वाहिन्या एखाद्या ठिकाणहून जात असतील तर तिथे विरोध करू नये. पर्रा भागात अलिकडेच खूप विरोध झाला, असे काब्राल म्हणाले.
महाराष्ट्र व कर्नाटकच्या तुलनेत गोव्यात वीजेचे दर कमी आहेत. आमच्याकडे पुष्कळ ट्रान्सफॉर्मर्स उपलब्ध आहेत. एखाद्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मोडला तर, आम्ही नवेच ट्रान्सफॉर्मर्स बसवतो. लोकांना व दक्षिणेच्या एका सरपंचालाही तांत्रिक गोष्टी कळतच नाहीत. वीज नाही म्हणजे नेमके काय झाले हे न कळताच लोक बोलतात असेही काब्राल म्हणाले.