सरकारी नोकऱ्यांचे गोव्यात रॅकेट
By admin | Published: September 16, 2014 01:21 AM2014-09-16T01:21:10+5:302014-09-16T01:22:03+5:30
बनावट नियुक्तिपत्रे : मराठी कॉल सेंटर; महाराष्ट्र व गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम असल्याचा बनाव
प्रवीण पाटील-पणजी : ‘नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर’मध्ये नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणारे एक भले मोठे रॅकेट उघड झाले आहे़ महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या संयुक्त उपक्रमातून संजीवनी आरोग्य योजनेअंतर्गत हे कॉल सेंटर सुरू करण्यात आल्याचा बनाव करून त्यासाठी ‘टेलिफोन आॅपरेटर’ हवे आहेत, अशी जाहिरात फसवेगिरी करणाऱ्यांनी देऊन तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे़
अमोल महापुरे (ऐतवडे-खुर्द, जि़ सांगली), अमोल सुरडकर, शरद पवार (पद्मावती, जि़ जालना) या तरुणांना कॉल सेंटरचे नियुक्तिपत्रही दिले आहे़
या तिघांनी दिलेल्या माहितीवरून गोवा आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ़ जुझे. ओ़ ए़ डिसा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारचा कोणताही उपक्रम गोवा सरकार राबवीत नसल्याचे सांगितले़ महाराष्ट्र आरोग्य विभागाचे संचालक डॉ़ सतीश पवार यांनाही महाराष्ट्र सरकार असे कोणतेही कॉल सेंटर चालवत नसल्याचे सांगितले़
याप्रकरणाबाबत अमोल महापुरे म्हणाला की, २ आॅगस्ट एक जाहिरात वाचली, त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नाव, पत्ता व शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती पाठवली़ ६ आॅगस्ट रोजी एका महिलेने फोन केला व दहा प्रश्न विचारले़ ८ आॅगस्ट रोजी दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा फोन करून त्या महिलेने काही प्रश्न विचारले़ उत्तरे दिल्यानंतर ‘काय जॉब आहे? काय करावे लागेल,’ अशी विचारणा केली़ त्यावर तुम्हाला लवकरच आम्ही सर्व माहिती पाठवू, असे सांगण्यात आले़ अमोल सुरडकर व शरद पवार यांनीही अशीच माहिती दिली़
काही दिवसांनी तिघांना पोस्टाने रजिस्टर एडी केलेले एक पाकीट आले़ त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘संजीवनी आरोग्य योजना’चे मराठी कॉल सेंटर असे ठसठशीत अक्षरांत लिहलेले पत्र, संयुक्त सचिव सत्यपाल चौहान व खजिनदार सुनील तावडे नामक व्यक्तींच्या सह्या असलेले नियुक्तिपत्र, नवसंजीवनी मराठी चिकित्सा सेवा (कॉल सेंटर) असे शीर्षक असलेले माहितीपत्र होते़
कॉल सेंटरशी संबंधित महिलेने त्या तिघांना पुन्हा फोन केला व नियुक्तिपत्रावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून भारतीय स्टेट बँकेचा खाते क्रमांक घेण्यास सांगितले़ त्या खात्यावर अमोल महापुरे याला ११ हजार तर अमोल सुरडकर व शरद पवार यांना प्रत्येकी ८ हजार रुपये भरण्यास सांगितले़ ही रक्कम तुम्ही २४ तासांच्या आत भरा, अन्यथा तुमचा अर्ज बाद करण्यात येईल, असे सांगण्यात आले़
सरकारी नोकरी मग पैसे का भरायचे, असा प्रश्न पडलेल्या तिघांनी नियुक्तिपत्रावर दिलेल्या गोव्यातील पत्त्याची चौकशी केली असता पत्ता चुकीचा असल्याचे समजले़
तत्परतेमुळे अमोल महापुरे, अमोल सुरडकर व त्याचा मित्र शरद पवार हे आर्थिक फसवणुकीपासून सावध झाले़ मात्र, या कॉल सेंटरच्या माध्यमातून आणखी किती तरुणांना जाळ्यात ओढले आहे, हे चौकशीअंती समोर येईल़