गोव्यात डिसेंबरपासून सरकारी नोकर भरती मोठ्या प्रमाणात, आरोग्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 02:19 PM2017-10-28T14:19:13+5:302017-10-28T14:23:20+5:30
गोव्यात येत्या डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर भरती सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेपाच हजार पदे भरली जातील, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी येथे जाहीर केले.
पणजी : गोव्यात येत्या डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर भरती सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेपाच हजार पदे भरली जातील, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी येथे जाहीर केले. मी शनिवारी सकाळीच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटलो आहे. त्यांनी नोकर भरती बंदी पूर्णपणे लवकरच उठविली जाईल व डिसेंबरपासून भरती सुरू होईल, असे आपल्याला सांगितल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
एका आरोग्य खात्यात एकूण दीड हजार पदे रिकामी आहेत. विद्यमान सरकारने युवा युवतींना नोकर्या देण्याचे ठरवले आहे. सध्या खातेनिहाय प्रक्रिया सुरू आहे. कुठच्या खात्याची किती गरज आहे ते पाहिले जात आहे. येत्या महिन्याच्या अखेरीस पद भरतीसाठी जाहिराती येणे सुरू होईल असे मंत्री राणे यांनी नमूद केले.
दरम्यान गोव्यातील सरकारी इस्पितळांमध्ये परप्रांतीय रुग्णांकडून शूल्क आकारण्याची योजना तयार असून येत्या 1 डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. गोमेकाॅ ह्या गोव्यातील सर्वात मोठ्या इस्पितळात बाह्यरूग्ण विभागामध्ये गोमंतकीय रुग्ण व परप्रांतीय रूग्ण यांच्यासाठी दोन स्वतंत्र रांगा असतील असे राणे यांनी सांगितले. शूल्क निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या दोन बैठका झाल्या असल्याचे राणे म्हणाले. म्हापसा येथील इस्पितळात 55 नव्या डाॅक्टरांची लवकरच नियुक्ती केली जाईल असेही राणे यांनी सांगितले.