सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, मात्र मी विश्वासघात करणार नाही- विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 08:05 PM2018-04-03T20:05:13+5:302018-04-03T20:05:13+5:30
राज्यात सोशल मीडियावरून चाललेला प्रचार, पीडीएच्या विषयावरून आंदोलन करण्याचे होत असलेले निर्णय, गुड फ्रायडेला काही चर्चमधून आंदोलनासाठी बळ देण्याचे झालेले प्रकार अशा विविध अनुभवांच्या पार्श्वभूमीवर नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना काही घटक सरकार अस्थिर करण्यासाठी सक्रिय झाले असल्याचे वाटत आहे.
पणजी : राज्यात सोशल मीडियावरून चाललेला प्रचार, पीडीएच्या विषयावरून आंदोलन करण्याचे होत असलेले निर्णय, गुड फ्रायडेला काही चर्चमधून आंदोलनासाठी बळ देण्याचे झालेले प्रकार अशा विविध अनुभवांच्या पार्श्वभूमीवर नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना काही घटक सरकार अस्थिर करण्यासाठी सक्रिय झाले असल्याचे वाटत आहे. मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत उपचार घेत असताना आपण त्यांचा विश्वासघात करणार नाही, अशी भूमिका मंत्री सरदेसाई यांनी मंगळवारी येथे मांडली.
ग्रेटर पणजी पीडीएमधून ताळगावचाही भाग काढला जावा, अशी मागणी लोकांकडून केली जात असल्याविषयी मंत्री सरदेसाई यांना पत्रकारांनी विचारले असता, सरदेसाई म्हणाले, की ताळगावचा भाग केवळ आताच पीडीएमध्ये आहे असे नाही. तो भाग पूर्वीपासून पीडीएत असून कधीच ताळगावच्या पंचायतीने, सरपंचांनी किंवा ताळगावच्या आमदाराने त्यास आक्षेप घेतला नाही. आता ताळगाव बाहेरील लोक जर तो भाग पीडीएमध्ये नको असे म्हणत असतील तर आपण त्याविषयी बोलू इच्छीत नाही. ताळगावच्या सरपंच व पंचायतीने त्याविषयी बोलावे.
मंत्री सरदेसाई म्हणाले, की येत्या 6 एप्रिल रोजी काही जण ग्रेटर पणजी पीडीएविरुद्ध पणजीत मोर्चा काढून व सभा घेऊन आंदोलन करणार आहेत. जे भाग अगोदरच आम्ही ग्रेटर पणजी पीडीएमधून वगळले आहेत, त्या भागांतील लोकांनी आंदोलन करणे हे समजण्यासारखेच नाही. आंदोलनाचा हेतू काय तोच मला कळत नाही. जे भाग ग्रेटर पणजी पीडीएमधून वगळा अशी मागणी सांताक्रूझ, सांतआंद्रेचे लोक करत होते, ते भाग आम्ही बाहेर काढलेच. लोकांची मागणी आम्ही मान्य केली. तरी देखील आंदोलन होत आहे.
सरदेसाई म्हणाले, की चर्च संस्थेशी निगडीत काही घटक देखील या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी सक्रिय होतात हे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. येत्या 6 रोजी पीडीएविरुद्ध होणा-या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन गेल्या गुड फ्रायडेला काही चर्चमधून लोकांना केले गेले. यामुळे आपण दुस-याच दिवशी ग्रेटर पणजी पीडीएतून बहुतेक भाग वगळले. आपण तसे करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची देखील मान्यता घेतली नाही. पीडीए चेअरमन बाबूश मोन्सेरात यांच्याशी देखील आपण त्याविषयी तपशीलाने पूर्वी बोललो नाही. मी नंतर आर्चबिशपांशीही चर्चा केली व हे नेमके काय चालले आहे, अशी विचारणा केली. चर्चमधून लोकांना गुड फ्रायडेवेळी पीडीएविरोधी सभेत भाग घेण्याचे आवाहन करण्याचा विषय नेमका काय आहे हे मी आर्चबिशपांना विचारले. बहुतेक भाग आम्ही पीडीएतून काढले असल्याचे मी त्यांना सांगितले.
सरदेसाई म्हणाले, की काही जण सरकार अस्थिर करू पाहत असावेत. मी विद्यमान सरकारमध्ये मंत्री असल्याने काही जण वेगळा डाव खेळू पाहत आहेत. सोशल मीडियावरूनही तसाच प्रचार चालतो. धूर येतोय म्हणजे कुठे तरी आग निश्चितच आहे. मात्र मी आगीला घाबरणार नाही. मी पर्रीकर यांचा विश्वासघात करणार नाही. निदान ते इस्पितळात उपचार घेत असताना तरी मला त्यांचा विश्वासघात करणे मान्य नाही.