सरकारचे आपत्ती व्यवस्थापन पडले उघडे; फेरीबोट ब्रेकडाऊन प्रकरणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

By किशोर कुबल | Published: June 26, 2024 02:38 PM2024-06-26T14:38:46+5:302024-06-26T14:39:06+5:30

सरकारने गेल्या सहा वर्षात फेरीबोटींच्या देखभालीवर काहीच उपाययोजना केल्या नसल्याचा दावा त्यांनी केला.

 Government's disaster management exposed; Opposition leader Yuri Alemav's attack on the ferry breakdown case |  सरकारचे आपत्ती व्यवस्थापन पडले उघडे; फेरीबोट ब्रेकडाऊन प्रकरणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

 सरकारचे आपत्ती व्यवस्थापन पडले उघडे; फेरीबोट ब्रेकडाऊन प्रकरणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

किशोर कुबल/पणजी : बेती-पणजी फेरीबोट बंद पडल्यावरुन  विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हल्लाबोल केला असून सरकारचे आपत्ती व्यवस्थापन उघडे पडल्याची टीका केली आहे.

युरी म्हणाले की, 'इतिहासाची पुनरावृत्ती झाली.,सरकारने धडा घेतला नाही हे उघड झाले. जुलै २०२८ मध्ये बेती - पणजी जलमार्गावर "पिएदाद' फेरीबोट बंद पडली होती. मंगळवारी हीच फेरीबोट पुन्हा बंद पडली. महिलांसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे सरकारचे बचाव कार्य पाहून भाजप सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचा परत एकदा पर्दाफाश झाला.', असे युरी म्हणाले. चार तासांहून अधिक काळ अडकून पडलेल्या प्रवाशांची गैरसोय झाल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारने गेल्या सहा वर्षात फेरीबोटींच्या देखभालीवर काहीच उपाययोजना केल्या नसल्याचा दावा त्यांनी केला.

काँग्रेस सरकारच्या काळात खरेदी केलेल्या फेरीबोटी भाजप सरकार अजूनही चालवत आहे. या फेरीबोटी पूर्ण पारदर्शकता राखून खरेदी करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे आजतागायत कार्यरत आहेत. काँग्रेस सरकार नेहमी उत्पादनाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करते आणि म्हणूनच या सर्व फेरीबोटी चालवण्यास आजही योग्य आहेत. दुर्दैवाने सदर  फेरीबोटींची देखभाल करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप युरी यांनी केला.

सौर फेरीबोट “परवडणारी नाही” असा स्पष्ट शेरा बंदर कप्तानानी मारुनही भ्रष्ट भाजप सरकारने ती खरेदी केली, मात्र सदर फेरीबोटीच्या उद्घाटनाच्या एका वर्षाच्या आत नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सदर सौर फेरीबोट "परवडणारी" नसल्याचे मान्य केले, यावर युरी यांनी बोट ठेवले.

बेती-पणजी फेरीबोट बंद पडण्याच्या कालच्या घटनेने नदी परिवहन खाते  तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. काल पिएदाद फेरीवर अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी चोडण मार्गावरील  फेरीबोट आणण्यात आली होती. परिणामी चोडण-रायबंदर मार्गावर गोंधळ निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title:  Government's disaster management exposed; Opposition leader Yuri Alemav's attack on the ferry breakdown case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा