स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत कार्यरत खासगी बसेस बंद पाडण्याचा सरकारचा डाव - खासगी बसमालकांचा आरोप
By पूजा प्रभूगावकर | Published: January 2, 2024 04:46 PM2024-01-02T16:46:01+5:302024-01-02T16:46:57+5:30
ताम्हणकर म्हणाले, की पणजी - मिरामार, पणजी - दोनापावला, पणजी - ताळगाव या परिसरात पोर्तुगिजकाळापासून खासगी बसेसची वाहतूक सुरु आहे.
पणजी: स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत इलैक्ट्रीक कदंब बसेस सुरु असून सध्या कार्यरत खासगी बसेस बंद पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप खासगी बसमालक संघटनेचे निमंत्रक सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली जाईल. वाहतूक खात्याने अधिसूचना करुन १९ जानेवारी पर्यंत पणजीतील विविध मार्गांवर या इलैक्ट्रीक बसेस धावतील. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसेसची सेवा बंद केली जाईल असे नमूद केले आहे. सरकारने ही अधिसूचना त्वरित मागे घ्यावी, अन्यथा न्यायालयात न्याय मागू अशा इशारा त्यांनी दिला.
ताम्हणकर म्हणाले, की पणजी - मिरामार, पणजी - दोनापावला, पणजी - ताळगाव या परिसरात पोर्तुगिजकाळापासून खासगी बसेसची वाहतूक सुरु आहे. मात्र आता अचानक वाहतूक खात्याने २८ डिसेंबर रोजी अधिसूचना जारी करुन पणजीतील प्रमुख मार्गांवर इलैक्ट्रीक कदंब बसेस धावतील व खासगी बसेसची सेवा बंद केली जाईल असे नमूद केले आहे. प्रत्यक्षात सदर निर्णय घेताना सरकारने आम्हाला विश्वासात घेणे अपेक्षित होते असे त्यांनी स्पष्ट केले.