गोव्यात सरकार स्थापनेला राज्यपालांचा अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:25 PM2019-03-18T13:25:43+5:302019-03-18T13:53:53+5:30
'गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीत कॉंग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाचारण करणे हे राज्यपालांचे कर्तव्य असून राज्यपाल मृदुला सिन्हा मात्र कॉंग्रेस नेत्यांना भेटण्यासही तयार नाहीत'
पणजी - गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीत कॉंग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाचारण करणे हे राज्यपालांचे कर्तव्य असून राज्यपाल मृदुला सिन्हा मात्र कॉंग्रेस नेत्यांना भेटण्यासही तयार नाहीत अशी माहिती देत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
चोडणकर म्हणाले, ‘‘गेले तीन दिवस आम्ही राज्यपालांची भेट मागत आहोत, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. राज्यपालांची नीती अशीच राहिली तर निषेध म्हणून राजभवनासमोर ठिय्या मांडण्यावाचून आमच्यासमोर अन्य पर्याय नसेल.’’ सद्यस्थितीत कॉंग्रेस हा राज्य विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष असून सरकार स्थापनेवर आपल्याच पक्षाचा अधिकार असल्याचे सांगून चोडणकर यांनी कर्नाटक राज्याचा दाखला दिला. त्रिशंकू विधानसभेची स्थिती टाळण्यासाठी तेथे सर्वांत मोठा असलेल्या कॉंग्रेसला राज्यपालांकडून पाचारण करण्यात आले आणि निधर्मी जनता दलाला पाठिंबा देत कॉंग्रेसने संयुक्त सरकार घडवले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेले बहुमत तुमच्याकडे आहे का असा प्रश्न केला असता चोडणकर म्हणाले की तो प्रश्न तुर्तास उपस्थित होऊ शकत नाही; राज्यपालांनी आम्हाला निमंत्रित करावे, आम्ही त्यांना बहुमताच्या समर्थनाची यादी देऊ. दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देताना राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेचे आमंत्रण द्यावे, आमचे बहुमत आम्ही राज्य विधानसभेत कधीही दाखवून देऊ शकतो, असे चोडणकर म्हणाले. मात्र, संधी सोडाच, साधी भेटण्याची तयारीही राज्यपाल दाखवत नसून हा राज्यघटनेचा सरळ सरळ उपमर्द असल्याची टीका त्यांनी केली.