गोविंदची 'विकेट' काढण्याचा डाव; २६.८५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सभापतींचा थेट आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2024 09:53 AM2024-02-03T09:53:53+5:302024-02-03T09:55:21+5:30
सत्ताधाऱ्यांतच वाद; आरोपबाजीचे फटाके, वैयक्तिक द्वेषापोटी टीका.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काणकोणात सांस्कृतिक कार्यक्रम केल्याचे भासवून कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप खुद्द सभापती रमेश तवडकर यांनी केल्याने खळबळ माजली आहे. त्यानंतर विरोधी आमदारांनीही गावडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत आपले सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचा दावा गोविंद गावडे यांनी केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांनंतर राजकीय वर्तुळात गावडेंची 'विकेट' काढण्याचा डाव खेळला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना सभापती तवडकर यांनी आपण हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे तसेच पक्षनेतृत्त्वाकडेही नेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काणकोणमधील काही लोक मला भेटले. पावसाळ्यात उघड्यावर कार्यक्रम होऊच शकत नाहीत, असे असताना माझ्या मतदारसंघात काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कला संस्कृती खात्याने लाखो रुपये दिल्याचे दाखवले. प्रत्यक्षात कार्यक्रम झालेच नाहीत, ही बाबदेखील लोकांनी माझ्या निदर्शनास आणून दिली व मला निवेदनही दिले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मी कोणत्याही परिस्थितीत हे सहन करणार नसून प्रकरण धसास लावणार आहे.
काणकोण येथे एकाच घरात दोन संस्था तयार करून कला व संस्कृती खात्यातर्फे पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोपही सभापतींनी केला. या संस्थांनी कुठलेही कार्यक्रम केले नाहीत, तरीही खात्याने त्यांना पैसे दिले. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. मंत्री गावडे यांच्या आशीर्वादानेच हे घडल्याचे सभापती म्हणाले.
५ लाख रुपयांपेक्षा जास्त खिरापत कशी?
तवडकर पुढे म्हणाले की, 'एखाद्या मंत्र्याला एका कार्यक्रमासाठी ५ लाख रुपयांपर्यंत देण्याचा अधिकार असतो. त्यापेक्षा जास्त केवळ मुख्यमंत्रीच मंजूर करू शकतात. उगाच खैरात म्हणून आपल्याच माणसांना पैसे वाटण्याचा अधिकार कुणालाही नाही. सरकारकडून जे अनुदान मिळते ते जनेतेचे पैसे असतात, त्यामुळे त्यालाही मापदंड असतो. पण या सर्व प्रकरणात कला व संस्कृती मंत्र्यांचा बेजबाबदारपणा स्पष्ट दिसून येत आहे. तसेच एक आमदार म्हणून मलादेखील माझ्या मतदारसंघात अडचणीत आणण्याचा प्रयत्न या मंत्र्यांकडून मुद्दामहून होत आहे. एकाच सरकारमधील असणाऱ्या ज्येष्ठ आमदाराला मंत्र्याने अशाप्रकारे अडचणीत आणणे हे चांगले नाही आणि यापुढे मी हे खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.
काय आहे आरोप
सभापती म्हणाले की, कुठलीही शहानिशा न करता सुमारे २६.८५ लाख रुपये कला व संस्कृती खात्यातर्फे या संस्थांना मंजूर करण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम केल्याचे सांगितले जाते. परंतु, या महिन्यात पाऊस असतो, त्यामुळे कार्यक्रम होऊच शकत नाहीत आणि झालाच तर आमदार या नात्याने मला किंवा तेथील सरपंच, उपसरपंच किंवा पंच सदस्यालाही का बोलविण्यात आले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत मी कला व संस्कृती खात्याच्या संचालकांकडे अहवाल मागितला आहे.
पद सोडा, चौकशीला सामोरे जा : सरदेसाई
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, सभापतींनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. जबाबदार पदावरील व्यक्तीने केलेल्या आरोपांची योग्य दखल घ्यावी, या प्रकरणात निधीचा गैरवापर झालेला आहे. त्यामुळे गावडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्वरित चौकशीला सामोरे जावे.
संस्थेची चौकशी करू : मुख्यमंत्री
सभापती तवडकर यांनी सरकारमधील कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल 'लोकमत'ने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता ते म्हणाले की, खात्याने दिलेले अर्थसाहाय्य संस्थेने नीट वापरले की नाही, याबाबत खात्याकडून त्या संस्थेची चौकशी करून घेईन.
नेमका अधिवेशनाचा मुहूर्त साधला हे दुर्दैव : मंत्री गावडे
मंत्री गोविंद गावडे यांनी आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले असून, आपण कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही, असा दावा केला आहे. सध्या मला मुद्दामहून टार्गेट केले जात आहे. तवडकर यांचा माझ्यावरील वैयक्तिक द्वेष स्पष्ट होत आहे. आरोप करण्यासाठी त्यांनी नेमका
विधानसभा अधिवेशनाचा मुहूर्त साधला, हे मोठे दुर्दैव आहे.'
ज्या काही गोष्टी आहेत त्या नियमानुसारच झालेल्या आहेत, असा दावा गावडे यांनी केला. ते म्हणाले की, मी काम करताना राजकारण मधे आणत नाही. लोकांचे, कलाकारांचे हित पाहूनच काम करतो. कार्यक्रम झाल्यानंतर सीएकडून आम्ही अहवाल घेतो व नंतरच पैसे दिले जातात. उगाच खिरापत वाटली जात नाही. कोणाच्या सांगण्यावरून मी चौकशी करणार नाही. खात्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेनुसार काम करण्यात येत आहे. कार्यक्रम झाला नसल्याचे उघडकीस आल्यास आम्ही व्याजासहीत पैसे वसूल करतो. यापूर्वी असे अनेकदा झाले असून, आम्ही पैसे परत घेतले आहेत. सभापतिपदी असलेल्या आमच्याच सरकारच्या ज्येष्ठ व्यक्तीने असे आरोप करणे हे नैतिकदृष्ट्या योग्य नव्हे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून न्याय देण्याची गरज आहे, असे गावडे म्हणाले.
राज्यपालांनी सरकारचे कौतुक केले अन् त्यानंतर काही मिनिटांनीच सभापतींनी मंत्री गावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. सरकारच्या कारभारावर काही बोलण्याची गरज नाही. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.
भाजप सरकार हे भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मंत्र्याच्या विरोधात गोंय सभापतींनीच भ्रष्टाचाराचे केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे मंत्री गोविंद गावडे यांना मंडळातून काढून टाकावे. - सुनील कवठणकर, काँग्रेस.