गोविंद गावडे यांचे मंत्रिपद मुख्यमंत्र्यांमुळेच सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2024 07:49 AM2024-05-29T07:49:07+5:302024-05-29T07:50:25+5:30
गावडे यांनी प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी कल्याण खात्यावर कडक भाष्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मंत्री गोविंद गावडे यांनी अलिकडे आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी समाज बांधवांच्या मनातील नाराजी ते व्यक्त करून दाखवू लागलेत, हे भाजपच्या काही नेत्यांना आवडत नाही, त्यामुळे भाजपच्या आतील वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गोविंद गावडे यांचे मंत्रीपद हे आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामुळेच सुरक्षित राहिले आहे, अशी चर्चा भाजप कोअर टीमच्या काही सदस्यांमध्येही सुरू झाली आहे.
गावडे यांनी प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी कल्याण खात्यावर कडक भाष्य केले. अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. गावडे हे मंत्रिमंडळात असल्याने तेच स्वतः सरकार आहेत. मात्र, एसटी बांधवांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एसटींना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देऊन गावडे मोकळे झाले. गावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर कुठेच टीका केलेली नाही. पण भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावडे यांच्या भूमिकेची दखल घेतलेली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात काही बदल करायचा विषय दिल्लीहून आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सध्या कोणताच बदल नको, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना कळवले होते. नीलेश काब्राल यांना एकट्यालाच काढून आलेक्स सिक्वेरा यांना घेतले तेवढे पुरे असे मुख्यमंत्र्यांनी हायकमांडला कळवले होते. त्यावेळीच गावडे यांचे मंत्रीपद गेले असते व रमेश तवडकर यांना मंत्रीपद मिळाले असते. मुख्यमंत्र्यांशी यापूर्वी गावडे यांचे कायम चांगले संबंध राहिले. सावंत यांच्यामुळेच गावडे यांचे मंत्रीपद आतापर्यंत तरी सुरक्षित राहिले आहे. यापुढे काय होईल कोण जाणे अशी चर्चा भाजपच्या अत्यंत जबाबदार अशा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.