दिवाडी बेटावर भव्य मंदिर उभारणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:56 PM2023-02-12T12:56:59+5:302023-02-12T12:57:45+5:30
मागील अनेक दिवसांपासून नागरिकांसह पर्यटकांनाही जिर्णोद्धारानंतर मंदिर दर्शनाची मोठी आस लागून राहिली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : गोव्याचे राजदैवत सप्तकोटेश्वर मंदिराचे नूतनीकरण ही ऐतिहासिक घटना आहे. पुढील पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी सरकार विविध उपक्रम हाती घेत आहे. सप्तकोटेश्वराचे मंदिर लोकार्पण करण्याबरोबरच अनेक किल्ले तसेच आध्यात्मिक, पर्यटन व इतर पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या अनेक मंदिरांच्या स्मृती जपण्याच्या हेतूने दिवाडी बेटावर भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. अशी वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर नूतनीकरण व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने मंदिराचा पर्यटन इतिहास आहोत. साडेतीनशे वर्षांनंतर पुन्हा एकदा नूतनीकरण करून पुढील शंभर वर्षांचे नियोजन करून मंदिराचे काम करण्यात आले आहे. गोव्यातील हिंदूच्या रक्षणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.
पुरातत्व खाते व गोवा सरकारतर्फे आठ कोटी रुपये खर्चून मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सोहळ्यास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार विजय सरदेसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले, देवस्थान प्रमुख वक्ते पांडुरंग बलकवडे, मंत्री निलेश काब्राल, राजू भोसले, अध्यक्ष उदय सरदेसाई, डॉ. चंद्रकांत शेट्ये, सरपंच संदेश पार्सेकर, शंकर चोडणकर, सिद्धेश नाईक, तुकाराम गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार विजय सरदेसाई व आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गोविंद भगत, सिद्धी उपाध्ये यांनी केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, या महोत्सवासाठी राज्यभरातील भाविकांबरोबरच सीमावर्ती भागातूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील अनेक दिवसांपासून नागरिकांसह पर्यटकांनाही जिर्णोद्धारानंतर मंदिर दर्शनाची मोठी आस लागून राहिली होती. भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"