सर्वच इंग्रजी शाळांना अनुदान द्या
By admin | Published: July 28, 2015 02:12 AM2015-07-28T02:12:42+5:302015-07-28T02:12:55+5:30
पणजी : राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सरकारी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी फोर्सच्या सदस्यांनी केली. मागण्या पूर्ण व्हाव्यात
पणजी : राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सरकारी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी फोर्सच्या सदस्यांनी केली. मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पणजी येथील आझाद मैदानावर फोर्सच्या सदस्यांनी एकत्रित येऊन उपोषण केले.
भाजपा सरकारने साडेतीन वर्षांपूर्वी निवडणुकीसाठी इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर याबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. मध्यंतरी शिक्षण क्षेत्रात बरेच
बदल करण्यात आले; पण या विषयाबाबत निर्णय घेणे सरकारला आवश्यक वाटत नाही. राज्यात हजारोंनी विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांत शिक्षण घेतात. राज्यातील ग्रामीण वस्तीतही अनेक इंग्रजी माध्यमाची चांगली विद्यालये उभी राहिली आहेत. अशा विद्यार्थ्यांना सरकारकडून अनुदान मिळाल्यासच विद्यालयांच्या साधनसुविधांत वाढ करता येईल.
शाळांना अनुदान देण्याबाबत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आश्वासन दिले होते. मात्र, सध्या सत्ताधारी शब्द फिरवत असल्याचे स्पष्ट जाणवते आहे. भाषावाद, शिक्षण हे केवळ राजकारणाचे माध्यम असून याद्वारे राजकारण्यांना राजकारण करण्याची संधी मिळते.
या वेळी मात्र अनुदानाचा प्रश्न ताबडतोब मिटविणे आवश्यक असून त्यासाठी मुदत देण्यात येणार नाही. जोपर्यंत सरकारकडून सर्व इंग्रजी शाळांना अनुदान देण्यात येईल अशी मागणी मान्य करण्यात येणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा फोर्सच्या सदस्यांनी दिला.