राज्यात हरित उद्योग उभारणार! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2024 08:12 AM2024-06-07T08:12:30+5:302024-06-07T08:12:41+5:30
डिचोली बगल रस्त्याचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी विविध उद्योग, प्रकल्प उभारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत सरकार राज्यात हरित उद्योगाला चालना देणार आहे. त्यासाठी आम्ही पायाभूत सुविधा मजबूत करत आहोत. अस्नोडा- मुळगाव बगल रस्ता व लांटबारसे उद्योग वसाहत ते विमानतळ नवा रस्त्याचे काम लवकर हाती घेणार असून डिचोली बगल रस्ता केवळ पाचशे दिवसात पूर्ण केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
तब्बल ७० कोटी रुपये खर्च करून व्हाळशी ते सर्वण असा चारपदरी बगल रस्ता पाचशे दिवसांच्या विक्रमी कालावाधीत पूर्ण करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, दीपा पळ, प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, मुख्य अभियंता अलेन परेरा, सचिन देसाई उपस्थित होते.
राज्यात गुंतवणूक वाढवताना मेडिकल, शैक्षणिक, ग्रामीण पर्यटन यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. उद्योग क्रांतीसाठी आमचे अनेक प्रकल्प आहेत. त्यासाठी उत्तम सेवासुविधा पुरवण्यावर सरकारने भर दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये व प्रेमेंद्र शेट म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. सावंत सतत डिचोली, मये परिसराच्या विकासाला चालना देत आहेत. आज अनेक प्रकल्प पूर्ण होण्याच्या वाटेवर आहेत. डबल इंजिनमुळे आज विकास गतिमान झाला आहे. आता बगल मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून डॉ सावंत यांचं चौफेर लक्ष असल्याने गोवा प्रगती चि शिखरे ओलांडत आहे. यावेळी अभियंते, कंत्राटदार यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कोनशीलेचे अनावरण व फीत कापून महामार्गचे उद्घाटन करण्यात आले. गोविंद भगत यांनी सूत्रनिवेदन केले.
महामार्ग कचरामुक्त ठेवा
राज्यात अनेक ठिकाणी महामार्गाच्या बाजूला कचरा टाकण्याचे प्रकार घडतात. रात्री कचरा फेकण्याचे उद्योग अनेक जण करत असतात. त्याबाबत लोकांनीच आता जागरूक होणे गरजेचे आहे. सरकार कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष योजना आखत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
अतिक्रमणे टाळा
सरकारच्या मालकीच्या जागेत काही लोक अडवणूक करतात. बेकायदा बांधकामे करतात हे लोकांनी त्वरित थांबावावे. सरकारी जमिनीत सरकार चांगले प्रकल्प, उद्योग आणून रोजगार व इतर विकासाला चालना देणार असल्याचे डॉ. सावंत
यांनी स्पष्ट केले.
डिचोली तालुक्यात विविध माध्यमातून कायापालट सुरु आहे. नवे बसस्थानक, अग्निशमक दल इमारत कामाला गती देण्यात येईल. त्याचबरोबर सरकारी इमारत संकुल जुने झाले असून त्याठिकाणी सुसज्ज भव्य प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रकल्प नियोजित आहे. लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री