दक्षिणेत गिरीश चोडणकर यांना हिरवा कंदील? चोडणकर यांच्या प्रचारार्थ गाठीभेटी सुरू
By वासुदेव.पागी | Published: March 30, 2024 03:54 PM2024-03-30T15:54:31+5:302024-03-30T15:54:44+5:30
इच्छुक उमेदवारांच्या यादीत उत्तरेत रमाकांत खलप, सुनील कवठणकर आणि विजय भिके तर दक्षिणेत विद्यमान खासदार फ्रांसिस सार्दीन, गिरीश चोडणकर आणि विरियाटो फर्नांडीस यांची नावे आहेत आणि उमेदवारीच्या बाबतीत मतैक्य न झाल्यामुळे अद्याप कुणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
पणजीः लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांसंबंधीचा गुंता सुटला नसल्यामुळे अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केली नसली तरी दक्षिण गोव्यात गिरीश चोडणकर यांना हायकमांडकडून हिरवा कंदील दाखविण्यात आल्याचे संकेत आहेत. कारण चोडणकर यांनी प्रचार दौरे सुरू केले आहेत.
इच्छुक उमेदवारांच्या यादीत उत्तरेत रमाकांत खलप, सुनील कवठणकर आणि विजय भिके तर दक्षिणेत विद्यमान खासदार फ्रांसिस सार्दीन, गिरीश चोडणकर आणि विरियाटो फर्नांडीस यांची नावे आहेत आणि उमेदवारीच्या बाबतीत मतैक्य न झाल्यामुळे अद्याप कुणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. या पार्श्वभुमीवर गिरीशचोडणकर यांनी शुक्रवारपासून गाठीभेटी सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यांना भेटणे तसेच मतदारांनाही भेटणे त्यांनी सुरू केले आहे. तुम्हाला उमेदवारी देण्याचे आश्वासन हायकमांडने दिले आहे काय असे विचारले असता त्यांनी याचे थेट उत्तर न देता आपण उमेदवारीच्या बाबतीत फार सकारात्मक असल्याचे सांगितले. शिवाय ते शनिवारी मडगावात व इतर ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचेही दिसून आले आहे. यामुळे उमेदवारीची माळ ही त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे तसेच त्यांना याची माहिती हायकमांडने दिली असल्याचे निष्कर्ष काढले जात आहेत. तसे स्पष्ट संकेतही मिळत आहेत.
दक्षिण गोव्यातील विद्यामान खासदार फ्रांसीस सार्दीन हे पुन्हा मतदारांच्या भेटीला कधी गेलेच नाहीत असे लोक सांगताहेत. त्यामुळे तुम्हाला कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून लोकांपुढे जाताना अडचण होणार नाही काय असे विचारले असता त्यांनी खासदार सार्दीन यांनी लोकांची कामे केली आहेत असे सांगितले. लोकसभेत त्यांनी मतदारसंघातील समस्या मांडल्या आहेत. त्यांनी केवळ आपल्या कामांची प्रसिद्धी केली नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान उत्तर गोवा मतदारसंघात रमाकांत खलप यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा असली तरी उत्तरेत तरी कुणी कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार थेट प्रचाराला लागले असे चित्र कुणी पाहिले नाही. दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा ही ३१ मार्च रोजी केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.