स्मृती इराणींच्या बार प्रकरणी गट विकास अधिकाऱ्यांची आसगांव पंचायतीला नोटीस
By किशोर कुबल | Published: August 4, 2022 08:11 PM2022-08-04T20:11:25+5:302022-08-04T20:12:13+5:30
केंद्रीय महिला, बाल कल्याणमंत्री स्मृती इराणींच्या गोव्यातील वादग्रस्त बार अॅण्ड रेस्टॉरण्ट प्रकरणी बार्देस गट विकास अधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी आसगांव ग्रामपंचायतीला नोटिस बजावून बार प्रकरणी सात दिवसांच्या आत पंचायतीकडील कागदपत्रे सादर करण्यास बजावले आहे.
किशोर कुबल
पणजी :
केंद्रीय महिला, बाल कल्याणमंत्री स्मृती इराणींच्या गोव्यातील वादग्रस्त बार अॅण्ड रेस्टॉरण्ट प्रकरणी बार्देस गट विकास अधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी आसगांव ग्रामपंचायतीला नोटिस बजावून बार प्रकरणी सात दिवसांच्या आत पंचायतीकडील कागदपत्रे सादर करण्यास बजावले आहे.
पंचायत संचालक सिध्दी हळर्णकर यांनी या प्रकरणी २७ रोजी गट विकास अधिकाºयांना या प्रकरणात समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांच्या तक्रारीवर कारवाई करण्यास बजावले होते.
आयरिश यांनी मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणात अबकारी खाते, पंचायत तसेच नगर नियोजन खात्याच्या अधिकाºयांना कारवाईसाठी मुक्त हस्त द्यावा व खरे काय ते बाहेर यावे, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. स्मृती इराणींचे कुटुंबीयच हा बार चालवत असल्याचे पुरेसे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात इराणी सत्य लपवू शकणार नाहीत. त्यांनी सत्य काय ते उघड करावे, असे आवाहनही आयरिश यांनी केले आहे.
दरम्यान, या प्रश्नावर आयरिश यांनी इराणींना याआधी खुल्या व्यासपीठावर चर्चेचेही आव्हान दिले आहे. इराणी यांनी अजून हे आव्हान स्वीकारलेले नाही. या बारसाठी मृत व्यक्तीच्या नावावर परवाना घेण्यात आला तसेच बारचे बांधकामही बेकायदा असल्याच्या आपल्या आरोपांवर आयरिश हे ठाम आहेत. बेकायदा परवाना प्रकरणी त्यांनी गोवा अबकारी आयुक्तांकडे तक्रार केली असून त्यावर सुनावणी चालू आहे. स्मृती इराणी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले असून या बारशी आपला संबंध नसल्याचे जाहीर केले आहे.