अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव, गोव्यात कार्निव्हलच्या आयोजनास विरोध वाढला
By महेश गलांडे | Published: February 6, 2021 01:31 PM2021-02-06T13:31:40+5:302021-02-06T13:32:38+5:30
कार्निव्हल हे पर्यटकांसाठीही आकर्षण असते. कारण कार्निव्हल मिरवणुकीत शेकडो रंगीबेरंगी चित्ररथ सहभागी होतात व शेकडो कलाकारही त्यात भाग घेतात.
पणजी : कोविड संकट काळात कार्निव्हलचे आयोजन कशाला करायला हवे असा प्रश्न विचारत सध्या विरोधी घटक कार्निव्हलच्या आयोजनास विरोध करू लागले आहेत. सरकारवर टीकाही होत आहे. पण, सरकारी यंत्रणा व राज्यातील पालिका कार्निव्हलचे आयोजन करण्यावर ठाम आहेत. येत्या १३ फेब्रुवारीपासून गोव्यात कार्निव्हलला आरंभ होत आहे. गोव्यात पोर्तुगीजांची राजवट होती, त्यावेळपासून कार्निव्हल आयोजित केला जातो. खा, प्या व मजा करा असा, संदेश देणाऱ्या किंग मोमोची राजवट कार्निव्हलच्या काळात गोव्यातील शहरांमध्ये असते असे मानले जाते.
कार्निव्हल हे पर्यटकांसाठीही आकर्षण असते. कारण कार्निव्हल मिरवणुकीत शेकडो रंगीबेरंगी चित्ररथ सहभागी होतात व शेकडो कलाकारही त्यात भाग घेतात. सरकारचे पर्यटन खाते कार्निव्हच्या आयोजनात भाग घेत असते. मात्र, कोविड संकट काळात कार्निव्हल नको अशा प्रकारचे मत विरोधी आमदारांपैकी काहीजण व्यक्त करू लागले आहेत. पणजीसह अन्य शहरांमध्ये कार्निव्हल मिरवणुकीवेळी वाहतुकीचेही प्रश्न निर्माण होतात. त्यामुळेही कार्निव्हल नको अशा प्रकारची भूमिका अनेकजण घेतात. कार्निव्हल हा ख्रिस्ती धर्मियांचाच सण आहे अशा प्रकारचे चुकीच चित्र काहीजण पूर्वी उभे करत होते. चर्च संस्थेने कार्निव्हलशी आपला काही संबंध नाही असे यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे. कार्निव्हलमध्ये पूर्वी थोडी अश्लिलता यायची, ती आता राहिलेली नाही.
कार्निव्हल हा केवळ कमिशन खाण्यासाठी काहीजणांना हवा आहे अशा प्रकारची टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनीही यंदा प्रथमच कार्निव्हलला आक्षेप घेतला आहे. पणजीत चार दिवस कार्निव्हलनिमित्त विविध कार्यक्रम होतील असे महापौर उदय मडकईकर यांनी जाहीर केले. मात्र कार्निव्हलवेळी सोशल डिस्टनसींग पाळले जात नाही व मास्कचाही वापर केला जात नाही, त्यामुळे कार्निव्हलला आपला आक्षेप आहे असे सुरेंद्र फुर्तादो म्हणाले.
दरम्यान, कार्निव्हल रद्द करा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे. लांगूलचालन आणि कमिशनसाठी लोकांचे जीव धोक्यात घालू नका, असे वेलिंगकर म्हणाले.