गोव्यात सांस्कृतिक पर्यटनासाठी जीटीडीसीचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 07:46 PM2018-11-03T19:46:03+5:302018-11-03T19:47:09+5:30
आग्वाद येथील किल्ल्याच्या ठिकाणी साऊंड आणि लाईट शो तूर्त करता येणार नाही याची जाणीव झाल्यानंतर गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) बागा येथील समुद्रकिना-याजवळ साऊंड व लाईट शो आयोजित करण्याचे ठरविले आहे.
पणजी : आग्वाद येथील किल्ल्याच्या ठिकाणी साऊंड आणि लाईट शो तूर्त करता येणार नाही याची जाणीव झाल्यानंतर गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) बागा येथील समुद्रकिना-याजवळ साऊंड व लाईट शो आयोजित करण्याचे ठरविले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे गोव्यात सांस्कृतिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, असे महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांचे म्हणणे आहे.
बागा येथील समुद्रकिना-याजवळ जिथे वाहन पार्किंगसाठी जागा आहे, तेथील जागेवर स्टेज उभी केली जाईल. तिथे लाईट शो होईल. त्याचबरोबर गोव्याच्या लोककला, गोव्याची संस्कृती, गोव्याचा वारसा याचे दर्शन घडविणारे उपक्रमही तिथे होतील. म्हणजेच तो निव्वळ साऊंड व लाईट शो नसेल. गोवा मुक्तीसंग्रामाचीही माहिती तेथील उपक्रमांमधून दिली जाईल. मुक्ती लढय़ातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची व कर्तृत्वाची गाथाही सांगितली जाईल. पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी शनिवारी येथे लोकमतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. बागाचा साऊंड व लाईट शो हा तिकीट शो असेल. प्रेक्षक तिकीट खरेदी करून तिथे येतील. राज्यात सांस्कृतिक पर्यटन अशा प्रकारच्या उपक्रमांमुळेच वाढीस लागेल, असे देसाई म्हणाले.
आग्वाद किल्ल्यावर साऊंड व लाईट शो आयोजित करण्याची अगोदर पर्यटन महामंडळाची योजना होती पण तिथे जीसीङोडएमएसह पुरातत्त्व खाते व अन्य अनेक यंत्रणांची परवानगी तथा ना हरकत दाखले घ्यावे लागतात. नॅशनल मोनुमेन्ट्स अथोरिटीची मान्यता अजून मिळालेली नाही. ती मान्यता प्राप्त करून मग साऊंड शो सुरू करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागेल. त्यामुळे तूर्त बागा येथेच शो सुरू करण्यावर महामंडळाच्या संचालक मंडळानेही शिक्कामोर्तब केले. प्राथमिक काम सुरू झाले आहे. न्यूव लिग या कंपनीला कंत्रट मिळाले आहे.