राज्यभर गुढीपाडवा, हिंदू नवीन वर्ष साजरा; मंत्री-आमदारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
By समीर नाईक | Published: April 9, 2024 04:03 PM2024-04-09T16:03:13+5:302024-04-09T16:03:52+5:30
अनेकांनी गुडी पाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर नवीन वाहने देखील खरेदी केल्या.
समीर नाईक, पणजी: राज्यभर मंगळवारी गुढीपाडवा आणि हिंदू नवे वर्ष साजरे करण्यात आले. या निमित्त राज्यातील सर्व देवळांमध्ये खास धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते, तसेच ठिकठिकाणी प्रभात फेरी, वाहन फेरी, शोभायात्रांचे आयोजनही करण्यात आले होते. सांखळी येथे गुडीपाडव्या निमित्त आयोजित शोभा यात्रेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील उपस्थित राहिले होते.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गोमंतकीयांचा संसार पाडवा. गोमंतकीयांनी मंगळवारी नवीन वर्षाचा नवा संकल्प करत दारात बांबू उभारुन त्यावर घरातील रंगीत खण व तत्सम पवित्र वस्त्राला बांधत त्यावर तांब्या, पितळेचा कलश अडकवून आंब्याची पाने व फुलांची माळ घालून गुढी उभारली. अनेकांनी गुडी पाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर नवीन वाहने देखील खरेदी केल्या.
या ठिकाणी झाली शोभा यात्रा
पणजीतील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात गुडी उभारून दरवर्षी शहरात शोभायात्रा काढण्यात येते. यंदाही मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थित राहत या शोभायात्रेची शोभा वाढविली. पर्वरी येथील पुंडलिक नगर येथे देखील खास प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच म्हापसा, पेडणे, सावईवेरे, फोंडा, मडगाव, दवर्ली, काणकोण येथे शोभायात्रा पार पडल्या. पहाटे ६.३० ते ८ च्या सुमारास या शोभायात्रा पार पडल्या. ज्येष्ठासोबत महिला, युवकांनी देखील मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती यावेळी लावली.
आमदार, मंत्र्यांनी उभारली गुढी, शुभेच्छांचाही वर्षाव
सर्व हिंदू आमदार, मंत्र्यांनी आपल्या घरी गुढी उभारून नवे संकल्प घेतले. सोशल मीडियावर देखील त्यांनी हे फोटो शेअर करत, आपल्या कार्यकर्ते, मतदारांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान इतर धर्मातील आमदार मंत्र्यांनी गुढी पाडव्याचे औचित्य साधून सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला.