गुजराती पर्यटकांची गोव्यामध्ये दिवसेंदिवस वाढतेय संख्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 02:42 PM2017-11-02T14:42:11+5:302017-11-02T14:42:11+5:30

गुजराती पर्यटकांची संख्या गोव्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवाळीत मोठ्या संख्येने गुजराती बांधवांनी पर्यटनासाठी गोव्यामध्ये हजेरी लावल्याचे धारगळ आरटीओ चेक नाक्यावरील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. 

Gujarati tourists are increasing day by day in Goa | गुजराती पर्यटकांची गोव्यामध्ये दिवसेंदिवस वाढतेय संख्या 

गुजराती पर्यटकांची गोव्यामध्ये दिवसेंदिवस वाढतेय संख्या 

Next

पणजी : गुजराती पर्यटकांची संख्या गोव्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवाळीत मोठ्या संख्येने गुजराती बांधवांनी पर्यटनासाठी गोव्यामध्ये हजेरी लावल्याचे धारगळ आरटीओ चेक नाक्यावरील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.  अलीकडच्या काळात गुजरातमध्ये टूर ऑपरेटर्सची संख्या वाढलेली आहे. गुजरातहून सुटणाऱ्या बस गाड्या महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे घेत महाबळेश्वर व पुढे गोवा, मंगळूरपर्यंत जातात. यंदा दिवाळीच्या सुट्टीत गुजरात रजिस्ट्रेशनच्या बसगाड्या मोठ्या संख्येने गोव्यात आल्या धारगळ आरटीओ चेक नाक्यावर नोंदीनुसार सर्वाधिक महसूल प्रवासी कराच्या स्वरूपात 24 ऑक्टोबरला वाहतूक खात्याला मिळाला. 1974 च्या मोटर वाहन कर कायद्यानुसार व्यावसायिक बसगाड्यांना प्रवासी कर आकारला जातो. 

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 55 लाख रुपये प्रवासी कर प्राप्त झाला होता. यंदा हा आकडा एक कोटीवर पोहोचला आहे. सरकारी कर्मचारी दिवाळीच्या सुट्टीत प्रवास भत्ता घेऊन सहलीवर येतात. सप्टेंबर महिन्यात 41 लाख 70 हजार रुपये प्रवासी कर स्वरूपात मिळाले.
गेल्या महिन्यात 24 ऑक्टोबर या एकाच दिवशी आठ लाख रुपये प्रवासी कर मिळाला. येणाऱ्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे मे महिना अखेरपर्यंत देशी पर्यटक गोव्यात हजेरी लावत असतात.
किनारे, चर्च आणि मंदिरे, धबधबे त्याचबरोबर जलसफर घडवून आणणा-या क्रुझ बोटी, कॅसिनो आदी सर्वत्र पर्यटकांचे लोंढे दिसू लागले आहेत. गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचा माहोल असल्याने तेथील लोकांनी सहली काढल्या असाव्यात. जुने गोवे येथील सेंट झेविअर चर्च परिसरात तसेच राजधानी पणजी शहरात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात नेहमीचेच बनले आहेत.  15 लाख लोकसंख्या असलेल्या या राज्यात हजारोंच्या संख्येने देशी पर्यटक येत आहेत. कळंगुट, बागा, हणजुण, कोलवा, बेतालभाटी किना-यांवर बोटिंग, पॅराग्लाइडिंग तसेच जलक्रीडांसाठी गर्दी दिसून येते. केवळ किना-यांवरच नव्हे तर अन्य पर्यटनस्थळांवरही पर्यटक मोठ्या संख्येने दिसून येतात. 

राज्यातील हॉटेल फुल्ल आहेत. यंदा हंगामाची सुरवात ब-यापैकी झालेली आहे. गेल्या वर्षी ६३ लाख देशी पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा हा आकडा त्यापेक्षा अधिक असेल, असे संकेत मिळू लागले आहेत. गोव्यात साधारणपणे देशी पर्यटकांचे वास्तव्य तीन ते चार दिवस असते. या काळात गोव्यातील धार्मिक स्थळे, किनारे, धबधबे आदी पर्यटनस्थळांना भेट देत असतात. 

Web Title: Gujarati tourists are increasing day by day in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.