इयत्ता ८ वीतील गुंजन नार्वेकरचा विक्रम! ६२ तासांत तीन शिखरे केली सर
By समीर नाईक | Published: July 27, 2023 06:23 PM2023-07-27T18:23:42+5:302023-07-27T18:24:12+5:30
गुंजन ही पर्वरीतील ज्ञान विकास विद्यालयात इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे.
पणजी (गोवा) : पर्वरी येथील गुंजन पंकज प्रभू नार्वेकर या १२ वर्षीय मुलीने लदाख येथील मर्खा व्हॅली भागातील माउंट कांग येतसे-२ (६२५० मीटर), माउंट रेपोनी मल्लारी-१ (६०९७ मीटर) आणि माउंट रेपोनी मल्लारी-२ (६११३ मीटर) अशी तीन शिखरे ६२.५ तासात यशस्वीरीत्या पूर्ण करत जागतिक स्तरावरील नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी १३ वर्षीय मुलाने २ शिखरे सर करण्याचा विक्रम केला होता, पण तीने ३ शिखरे सर करत हा विक्रम मोडला आहे.
गुंजन ही पर्वरीतील ज्ञान विकास विद्यालयात इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे. गुजनने वरील तीन शिखर ४९तासात पूर्ण केले. पण बेसकॅम्प ते तीन शिखर आणि पुन्हा बेसकॅम्प असा हा प्रवास करायला तीला ६२.५ तास लागले. महत्वाचे म्हणजे तीने सर केलेले तीन शिखरे ही ६००० मीटरपेक्षा जास्तच आहे.
यापूर्वी गुंजनने ८ दिवसात एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक, मनाली येथील माऊंट फ्रेंडशिप पीक (५२८० मीटर) आणि लडाख भारतातील गोठलेल्या झांस्कर नदीवरील चद्दर ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. गुंजनला जलद चद्दर ट्रेक पूर्ण करणारी सर्वात कमी वयाची मुलगी म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मान्यता मिळाली आहे.
१५ जुलै रोजी माउंट कांग येतसे-२, माउंट रेपोनी मल्लारी-१ आणि माउंट रेपोनी मल्लारी-२ या ट्रेकिंगला सुरुवात केली आणि २१ जुलै रोजी फक्त सात दिवसांच्या कालावधीत मी हे तीन शिखर सर केले. बेस कॅम्प ते शिखरापर्यंतचा प्रवास खूपच थकवणारा होता कारण शिखरावर पोहोचण्यासाठी आणि परत जाण्यासाठी १२ ते १४ तास सतत चढाई करावी लागली. हा पराक्रम करण्यासाठी मी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले. - गुंजन नार्वेकर