सांतीनेजमध्ये गटाराची संरक्षण भिंत कोसळली; देवस्थान तसेच नागरिकांना धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 02:34 PM2024-06-10T14:34:31+5:302024-06-10T14:34:47+5:30
पणजी स्मार्ट सिटीची कामे ७ जून पर्यंत संपविण्याचे आदेश स्मार्ट सिटीला दिले होते. त्यामुळे घाईगडबडीत तसेच बेजबाबदार पणाने काम केल्याने ही संरक्षण भिंत कोसळली आहे.
- नारायण गावस
पणजी: शनिवार रविवार राज्यात पडलेल्या मुसळधार पावसाने स्मार्ट सिटीने सांतीनेज ताडमाड येथे गटारासाठी बांधण्यात आलेली संरक्षण भिंत कोसळली. तसेच हा गटार खचल्याने ताडमाड देवस्थानच्या मंदिर तसेच वडाच्या झाडाला धोका निर्माण झाला आहे. पणजी महानगर पालिकेचे महापौर राेहित मोन्सेरात यांनी तातडीने याची पाहणी करुन मंदिराला कुठलाच धोका न पोहचता १० दिवसांच्या आत या कोसळलेल्या भिंतीचे काम पुन्हा करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत. या कंत्राटदारावरी गुन्हा नोंद करण्याची मागणीही केली जात आहे.
पणजी स्मार्ट सिटीची कामे ७ जून पर्यंत संपविण्याचे आदेश स्मार्ट सिटीला दिले होते. त्यामुळे घाईगडबडीत तसेच बेजबाबदार पणाने काम केल्याने ही संरक्षण भिंत कोसळली आहे. या परिसरातील लोकांनी तसेच पणजीतील नागरिकांनी याचा संताप व्यक्त केला आहे. ताडमाड येथील हे जागृत देवस्थान असून या खचलेल्या भिंतीमुळे या वडाच्या झाडाला तसेच मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता लोकांकडून व्यक्त केली जात आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही भिंत कोसळली आहे असा आरोप केला जात आहे. या हलगर्जीपणाच्या कामाचा सर्व स्तरातून राग तसेच निषेध व्यक्त केला जात आहे. या विषयी गाेवा फॉरवर्ड, आम आदमी पक्षाने याचा निषेध केला असून या प्रकरणी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कंत्राटदारावर गुन्हा नोंद करा : गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई
गोवा फॉरवर्डचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई यांनी या कोसळलेल्या भिंतीची दखल घेत मुख्य सचिवांना पत्र लिहून स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. कंत्राटदाराच्या या बेजबाबदार कामामुळे ताडमाड येथील या देवस्थानला धोका निर्माण झाला आहे. या कंत्राटदारांनी कमी दर्जाचे तसेच चुकीच्या पद्धतीने कामे केल्याने असे प्रकार घडत आहेत. या अगोदर स्मार्ट सिटीच्या कामाचा पणजीकरांना तसेच पणजीत येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला. या सर्व कामाचे ऑडिट करुन सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कंत्राटदाराचा बचाव : आप प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर
आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, या स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. स्मार्ट सिटीच्या कामात हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास व नुकसान होत आहे तरी मुख्यमंत्री या कंत्राटदाराला पाठीशी घालत आहे. या कोसळलेल्या भिंतीमुळे येथील देवस्थान तसेच लोकांना धोका निर्माण झाला आहे. पण आता विरोधक गप्प बसणार नसून या विरोधात राज्यभर आवाज केला जाणार आहे.