दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 07:27 PM2021-12-07T19:27:46+5:302021-12-07T19:27:54+5:30
मावजो हे लघू कथाकार व कादंबरीकार म्हणून प्रसिध्द आहेत. गेली चार दशके त्यांनी विपुल कोकणी लेखन केले आहे.
पणजी : गोव्याचे ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दामोदर मावजो (वय ७७) यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. मावजो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे गोमंतकीय सुपुत्र ठरले आहेत. याआधी २00८ साली दिवंगत रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
मावजो हे लघू कथाकार व कादंबरीकार म्हणून प्रसिध्द आहेत. गेली चार दशके त्यांनी विपुल कोकणी लेखन केले आहे. कथासंग्रह, कादंबºया, पटकथालेखन, स्तंभ लेखन, नाट्य लेखन केले आहे. मावजो यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्याने सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
मावजो यांना १९८३ साली कार्मेलिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. ‘कार्मेलिन’ ही त्यांची गाजलेली कादंबरी होय. डझनभराहून अधिक भाषांमधून या कादंबरीचा अनुवाद करण्यात आला. कोकणीतील त्यांच्या कथा अनुवादित करुन अनेक भाषांमधून राष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून प्रसिध्द झालेल्या आहेत. त्यांच्या काही कथांचा इंग्रजी, पोर्तुगीज व फ्रेंचमधून अनुवाद झालेला आहे.
मावजो यांनी साहित्यातील अनेक पुरस्कार प्राप्त केले. १९८८ साली सर्जनशील फिक्शनसाठीचा कथा पुरस्कार, १९९७ साली गोवा राज्य फिल्म महोत्सवात उत्कृष्ट संवाद लेखनाचा पुरस्कार, कला अकादमी पुरस्कार, कोकणी भाषा मंडळ पुरस्कार मिळाला. २0११-१२ साली त्यांना केंद्रीय संस्कृती मंत्रालयाची फेलोशिप मिळाली. २0११ साली ‘त्सुनामी सायमन’ या कादंबरीसाठी त्यांना विमला पै विश्व कोकणी साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘तेरेसाज मॅन अॅण्ड अदर स्टेरीज फ्रॉम गोवा’या कथासंग्रहाला २0१५ साली फ्र ँक ओ कॉनोर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. साहित्य अकादमीवर त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर ते सदस्यही होते.
२0१५ साली एम. एम. कलबर्गी यांचा कर्नाटकात खून झाला त्यावेळी त्यांनी उघडपणे आपले विचार मांडत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणाºयांवर आगपाखड केली होती. पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरणानंतर मावजो यांच्या जीवालाही त्यावेळी धोका असल्याचे कर्नाटक पोलिसांना आढळून आले होते.
१९७५ साली त्यांची ‘सूड’ ही कादंबरी प्रसिध्द झली त्यानंतर १९८१ साली कार्मेलिन, २00९ साली त्सुनामी सायमन व २0२0 साली ‘जीव दिंव काय च्या मारु ’ ही कादंबरी प्रकाशित झाली. गांथन, जागरणां, रुमडफूल, भुरगीं म्हगेली ती, सपनमोगीं, तिष्टावणी हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह होत.