मडगावात आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भिंतीचा अर्धा भाग कोसळला: सुदैवाने मनुष्यहानी टाळली
By सूरज.नाईकपवार | Published: July 8, 2023 06:16 PM2023-07-08T18:16:35+5:302023-07-08T18:16:43+5:30
सव्वातीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.
मडगाव: गोव्यातील मडगाव येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भिंतीचा अर्धा भाग कोसळला. रात्री ही घटना घडल्यामुळे सुदैवाने मनुष्य हानी टळली. सव्वातीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली. एका दुचाकीचीही हानी झाली. रात्री पडलेल्या मुसळधार पावसात वरील घटना घडली.
या घटनेची प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या घटनेची त्वरित दखल घेताना आपण संचालकाला घटनास्थळाची पाहणी करुन गोवा साधनसुविधा महामंडळाला याबाबत कळवावे, असे सांगितले आहे. संचालकाला ही फाईल आरोग्य सचिव, सरकार व कॅबिनेटला सादर करण्यास सांगितले आहे, असे स्पष्ट केले आहे.
ही इमारत पुरातन असून, त्याचे संर्वधन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे. जीएसआयडीसी या इमारतीची काळजी घेईल तसेच जुन्या हॉस्पिसियो इस्पितळाच्या दुरुस्तीचे काम करेल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आपण स्वत: हे काम आघाडीने पूर्ण करू, असेही ते म्हणाले. १९६१ सालची ही इमारत आहे. मडगावचे आमदार दिंगबर कामत तसेच फातोर्डयाचे आमदार विजय सरदेसाई यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.