गोव्यात हॉटेलांच्या निम्म्या खोल्या रिकामीच, चुकीच्या मार्केटिंग धोरणाला दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 08:45 PM2018-12-19T20:45:58+5:302018-12-19T20:46:17+5:30
नाताळ, नववर्ष तोंडावर असताना पर्यटकांनी मात्र गोव्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.
पणजी - नाताळ, नववर्ष तोंडावर असताना पर्यटकांनी मात्र गोव्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. हॉटेलांमधील निम्म्या खोल्या रिकामी असल्याचा दावा व्यावसायिक करत असून पर्यटन खात्याच्या चुकीचे मार्केटिंग धोरण याला कारण असल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे.
टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी)चे अध्यक्ष सावियो मेशियस म्हणाले की, ‘चार्टर विमानांची संख्या निम्म्याने घटलेली आहे. रशियन पर्यटकही कमी झाले आहेत. पर्यटन खात्याचे मार्केटिंग धोरण बरोबर नाही. हाय एंड पर्यटकांनी चक्क पाठ फिरवली आहे. मोठ्या हॉटेलांमध्ये ५0 टक्क्यांहून अधिक खोल्या रिकामी आहेत. राज्यात घरे, अपार्टमेंट बेकायदेशीररित्या पर्यटकांना देण्याचे प्रमाण वाढत आहे. पोर्टलवर जाहिरात करुन घरे भाड्याने दिली जातात. तेथे योग्य त्या सुविधा नसतात त्यामुळे पर्यटक नंतर पाठ फिरवतात. विदेशी पाहुण्यांची संख्या घटण्यामागे आर्थिक कारणही आहे.
अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की, ‘केवळ विदेशीच नव्हे, तर देशी पाहुण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. निम्म्याही खोल्या भरलेल्या नाहीत त्यामुळे दरही जुनेच ठेवले आहेत. नाताळ, नववर्षाला पुठील काळात एक दोन दिवस पर्यटक वाढतील परंतु डिसेंबर संपूर्ण महिना पर्यटकांविना गेला त्यामुळे व्यावसायिक संकटात आहेत.’ धोंड यांनीही सरकारच्या मार्केटिंग धोरणालाच दोष दिला.
कळंगुटचे आमदार उपसभापती मायकल लोबो म्हणाले की, ‘रशिया, इंग्लंड तसेच अन्य राष्ट्रांमधून विदेशी पर्यटकांना घेऊन येणाºया चार्टर विमानांची संख्या निम्म्याने घटली आहे. विद्यमान पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनाच याबाबतीत दोष देऊन चालणार नाही. गेल्या सहा वर्षात राज्य सरकारचे पर्यटन विषयक मार्केटिंग धोरण कोलमडले आहे. चुकीच्या धोरणामुळे गोव्याला दर्जेदार पर्यटक मिळू शकलेले नाहीत.