बाणास्तारी अपघात तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या; आमदार राजेश फळदेसाई यांची मागणी
By पूजा प्रभूगावकर | Published: August 16, 2023 02:36 PM2023-08-16T14:36:40+5:302023-08-16T14:38:16+5:30
जुने गोवे येथील गांधी सर्कल येथे मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून बाणास्तारी अपघातातील पीडितांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यावेळी फळदेसाई बोलत होते. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेटही घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.
पणजी : बाणास्तारी अपघाताचा तपास करण्यास म्हार्दोळ पोलिस असमर्थ ठरत असून सदर प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावेत, अशी मागणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केली.
जुने गोवे येथील गांधी सर्कल येथे मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून बाणास्तारी अपघातातील पीडितांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यावेळी फळदेसाई बोलत होते. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेटही घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.
फळदेसाई म्हणाले, की बाणास्तारी अपघाताला आठ दिवस उलटून गेले तरी अजूनही गोवा सावरलेला नाही. या अपघातातील पीडितांना न्याय हा मिळालाच पाहिजे. अपघाताचा तपास योग्य दिशेने करण्यास म्हार्दोळ पोलिसस्थानकाचे पोलिस निरीक्षक मोहन गावडे असमर्थ ठरत आहेत. म्हार्दाेळ पोलिस अपघाताचा तपास व्यवस्थित करीत नसून मुख्यमंत्र्यांना सुध्दा चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळेच अपघाताचा तपास हा याेग्य दिशेने असल्याचे त्यांना वाटत आहेत. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे.सदर पघाताचा तपास एकतर जुने गोवे पोलिसस्थानक किंवा गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावा अशी मागणी त्यांनी केली.