ड्रग्स फॅक्ट्रीमुळे हणजूण पोलिसांची नाचक्की
By वासुदेव.पागी | Published: May 3, 2023 07:35 PM2023-05-03T19:35:00+5:302023-05-03T19:35:15+5:30
पर्यटकांनी गजबजलेल्या हणजूण किनारी भागात ड्रग्सची फॅक्ट्री चालविली जाते आणि स्थानिक पोलिसांना याचा थांग पत्ताही लागत नाही.
पणजी (गोवा) : पर्यटकांनी गजबजलेल्या हणजूण किनारी भागात ड्रग्सची फॅक्ट्री चालविली जाते आणि स्थानिक पोलिसांना याचा थांग पत्ताही लागत नाही. नार्कोटीक कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) कारवाई करून ती उद्धवस्त करावी लागते, यावरून हणजूण पोलीसांची पूर्ण नाचक्की झाली आहे.
एखाद्या ठिकाणी गांजा उत्पादन करण्याचे कारनामे झाले तर त्या गोष्टी समजण्या सारख्या आहेत. कारण काहीही पेरले तर ते उगवतेच आणि गांजा आणि इतर वनस्पती हे समजण्यासाठी वेळ जावा लागतो. त्यामुळे अशा गोष्टी अनेक ठिकाणी घडल्याही आहेत, परंतु कच्चा माल आणून एलएसडी सारख्या विदेशी आणि अत्यंत घातक अंमली पदार्थ बनविण्याची फॅक्ट्रीच सुखेनैव सुरू आहे आणि स्थानिक हणजुणे पोलिसांना याचा पत्ताच नाही ही धक्कादायक गोष्ट आहे. यामुळे केवळ हणजुण पोलिसांची नव्हे तर गोवा पोलिसांची नाचक्की झाली आहे.
एनसीबीकडून हणजुणे येथे कारवाई करून गुप्तपणे कार्यरत असलेल्या एलएसडी ड्रग्सच्या उत्पादन केंद्राचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत २५.१७ लाख रुपयांचा ड्रग्ससाठा जप्त केला आहे आणि ए कुंडु नामक बंगाली व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी हरमल येथे कारवाई करून ३० लाखांचा ड्रग्स जप्त केल्यानंतर एनसीबीची ही दुसरी मोठी कारवाई आहे.
विस्तृत धागेदोरे
गोव्याबाहेरून कच्चा माल आणून या ठिकाणी एलएसडी हा घातक अंमली पदार्थ बनविला जात होता. या छाप्यात कच्चा माल आणणे म्हणजे त्यासाठी नियमित पुरवठादार असणार, शिवाय कच्चा मालापासून एलएसडी बनविणारीही माणसे असणार. त्यामुळे ही फॅक्ट्री म्हणजे फारच मोठा उद्योग होता हे उघड होत आहे. इतकेच नव्हे तर पोलिसांना या छाप्याच्यावेळी कच्चामालासह अमेरिकन डॉलर्स आणि श्रीलंकन चलनी नोटाही जप्त केल्या आहेत. त्यामुळे या फॅट्र्रीचे धागेदोरे विदेशातही पोहोचल्याचा एनसीबीला संशय आहे.
साथिदार मोकाट
या छाप्यात एकाला अटक करण्यात आली असली तरी एलएसडी निर्मिती हे एका माणसाचे काम असूच शकत नाही. कच्चा माल पुरविणारे आणि प्रत्यक्ष कच्चामालापासून एलएसडी बनविणारे आणि ते विकणारे कोण आहेत याची माहिती घेण्याचे एनसीबीडून प्रयत्न सुरू आहेत.