भाजप सरकारकडून खलाशी आणि परकीय चलन कमावणाऱ्यांची सतावणूक; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव
By सूरज.नाईकपवार | Published: December 24, 2023 12:37 PM2023-12-24T12:37:45+5:302023-12-24T12:56:54+5:30
भाजप सरकारकडून खलाशी व परकीय चलन कमावणाऱ्यांंची सतावणू होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.
मडगाव : भाजप सरकारकडून खलाशी व परकीय चलन कमावणाऱ्यांंची सतावणू होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे. नोकऱ्या नाहीत, पेन्शन नाही, नागरिकत्व नाही. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात भाजपा सरकारच्या अपयशामुळे, गोव्यातील तरुण परदेशात जातात, परकीय चलन मिळवतात आणि गोव्याच्या अर्थव्यवस्थेला आधार देतात. तरीही भाजप सरकार त्यांचे नागरिकत्व हिसकावून घेते. निवृत्त खलाशांना पेन्शनसाठी संघर्ष करावा लागतो. भाजप सरकार आपल्या गोमंतकीयांचा असा छळ का करत आहे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
गोवा सीफेअरर्स असोसिएशन ऑफ इंडियाने गोवा वेल्फेअर पेन्शन योजनेचे प्रलंबित अर्ज जलदगतीने मार्गी लावण्यासाठी केलेल्या मागणीवर भाजप सरकारच्या असंवेदनशील वृत्तीवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. इव्हेंट आयोजनवार अनेक कोटी खर्च केल्यानंतर सरकार सदर खर्चाला पोस्टफेक्टो मंजुरी घेते परंतु गरजूंना वेळेत पेन्शन वितरित करण्यासाठी आर्थिक मंजुरी जलदगतीने देण्याचे भाजप सरकारला सौजन्य नाही, असे आलेमाव म्हणाले.
गोव्यातील खलाशी व त्यांच्या विधवांचे २०१८ पासून शेकडो अर्ज सरकारच्या मंजुरीसाठी प्रलंबित असणे धक्कादायक आहे. सरकारने गृह विभाग आणि एनआरआय आयोगाच्या संबंधित अधिकार्यांना प्रलंबित अर्जांची छाननी जलद गतीने करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.खलाशांसाठी असलेली गोवा कल्याण पेन्शन योजना कायमस्वरूपी अधिसुचीत करायला भाजप सरकार का तयार नाही हे मला समजत नाही. परकीय चलन मिळवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबांला मदत करतानाच गोवा राज्याच्या विकासाला योगदान देण्यासाठी घरापासून हजारो मैल दूर राहणाऱ्या आमच्या मेहनती खलाशांचा आपण आदर केला पाहिजे, असे ते उदगारले.
राज्याची तिजोरी रिकामी करून कार्यक्रम आयोजित करण्याच्या ध्यासाने भाजप सरकार आंधळे झाले आहे. सणासुदीच्या काळात गोमंतकीयांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची संवेदनशीलता त्यांनी गमावली आहे, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला आहे.