गोव्यातील पाच राष्ट्रीय महामार्ग बनणार हरित, जीएसआयडीसीला ६४ कोटींचे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 07:26 PM2017-10-13T19:26:25+5:302017-10-13T19:26:50+5:30
राज्यातील पाच राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा फळा, फुलांची झाडे लावून हरित करण्यात येणार आहेत
पणजी - राज्यातील पाच राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा फळा, फुलांची झाडे लावून हरित करण्यात येणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने गोवा साधनसुविधा विकास महामंडळाकडे त्यासाठी शुक्रवारी दक्षिण गोव्यात केळशी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्या उपस्थितीत समझोता करार केला.
पत्रकार परिषदेत माहिती देताना महामंडळाचे अध्यक्ष आमदार दिपक पावस्कर यांनी अशी माहिती दिली की, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित महामार्ग धोरणा अंतर्गत देशात प्रथमच हे काम गोव्यात हातात घेण्यात येणार आहे. राज्यातील एकूण २६१ कि.मी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावली जातील त्यासाठी ६४ कोटी ३७ लाख २४ हजार ७११ रुपये केंद्र सरकारने मंजूर केले असून सर्व निधी केंद्र सरकारकडून मिळणार आहे. गोव्यातील हरित महामार्ग इतर राज्यांसाठीही आदर्श ठरणार आहे. लवकरच हे काम सुरु होणार असून पहिले वर्षभर झाडे लावण्याचे काम होईल त्यानंतर पाच वर्षे संबंधित कंत्राटदार झाडांची देखभाल करील.
महामंडळाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कुंकळयेंकर यांनी आर्किटेक्ट मंगेश प्रभूगांवकर यांनी यासंबंधीचा सविस्तर प्रकल्प अहवाल केल्याची माहिती देताना असे स्पष्ट केले की, गोव्यातील पारंपरिक झाडे महामार्गांलगत लावण्यास प्राधान्य दिले जाईल. वनस्पतीशास्र तज्ज्ञांचा सल्ला यासाठी घेतला जाईल. गोव्यात प्रवास करताना पर्यटकांनी रस्त्याच्या दुतर्फा फळा, फुलांच्या झाडांचा आनंद घ्याव्या जेणेकरुन त्यांचा प्रवासही सुखद होईल. चिंच, जांभूळ, फणस आदी फळझाडे तसेच फुलझाडेही लावली जातील.