अविश्वास ठरावावर ३१पूर्वी बैठक घ्या!
By admin | Published: October 14, 2014 01:43 AM2014-10-14T01:43:09+5:302014-10-14T01:44:51+5:30
पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला ३१ आॅक्टोबरपर्यंत बैठक घेऊन अविश्वास ठरावाचा सोक्षमोक्ष लावण्याचा
पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला ३१ आॅक्टोबरपर्यंत बैठक घेऊन अविश्वास ठरावाचा सोक्षमोक्ष लावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने दिला आहे.
गोवा राज्य सहकारी मंडळाचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावप्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीत खंडपीठाने ३१ आॅक्टोबरपूर्वी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बोलावून या ठरावावर निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे मंडळाला नव्याने ठरावावर मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे अविश्वास ठराव बारगळल्याचा उल्हास फळदेसाई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाचा दावा फोल ठरला आहे. विश्वास सिद्ध करण्यासाठी त्यांना १८ दिवसांत संचालक मंडळाची बैठक बोलावून संख्याबळ सिद्ध करावे लागणार आहे.
फुटलेल्या विरोधी सदस्यांनी आपला पाठिंबा विद्यमान अध्यक्षांनाच असल्याची प्रतिज्ञापत्रे सादर केल्यामुळे आणखी अविश्वास ठरावावर विचार करण्याचा प्रश्नच येत नसल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला आहे; परंतु विश्वास सिद्ध झाल्याशिवाय फळदेसाई यांना अध्यक्षपदी राहता येणार नाही, असा दावा रामचंद्र मुळे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाने केला आहे.