म्हादईप्रश्नी मी कसलीच तडजोड केली नाही: माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 10:43 AM2023-04-27T10:43:16+5:302023-04-27T10:44:20+5:30
'सेव्ह गोवा, सेव्ह टायगर' मोहिमेला कोरगावमधून प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: इतर राज्यातील राज्यकर्ते, नागरिक आपल्या विषयांवर एकत्र येतात. तशाच पद्धतीने गोमंतकीयांनी म्हादई वाचविण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. २०१६ साली म्हादई वाचविण्यासाठी ज्या पद्धतीने ठराव मंजूर झाला आणि मी मुख्यमंत्री असताना कसल्याच प्रकारची तडजोड केली नाही. गोमंतकीयांनी संघटित होऊन भवितव्याचा आणि वर्तमान काळाचाही विचार करून म्हादई नदी वाचविण्यासाठी एकत्रित यावे, असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.
आवाहन माजी मुख्यमंत्री प्राचार्य 'सेव्ह गोवा सेव्ह टायगर' या उपक्रमांतर्गत म्हादई वाचविण्यासाठी पेडणे तालुका नागरिक समिती सेव्ह म्हादई संघटनेमार्फत पेडणे तालुक्यातील वीस ग्रामपंचायती, पेडणे नगरपालिकेला निवेदन देण्यासाठी बुधवारी मोहीम सुरू केली. कोरगाव ग्रामपंचायतीला पहिले निवेदन सादर केले. यावेळी जनजागृती मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी पार्सेकर बोलत होते. पर्यावरण तज्ज्ञ, प्रा. राजेंद्र केरकर, सेव्ह म्हादईचे राजन घाटे, माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर, कोरगाव सरपंच समीर भाटलेकर, मरियानो फेराव, नागरिक समितीचे सदानंद वायंगणकर, साईनाथ आपुले, रोहिदास भाटलेकर, उमेश तळवणेकर आदी उपस्थित होते.
'हा विषय तालुका मर्यादित नसून राज्यातील आहे. त्यासाठी त्या-त्या पंचायतींनी ठराव घ्यावेत. संस्था, मंदिरे अशा संस्थांनीही ठराव घ्यावेत,' असेही आवाहन पार्सेकर यांनी केले. ते म्हणाले, माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत गोव्याच्या हितासाठी एकही बाधा घडणार नाही असा निर्णय कधी घेतला नाही. तीन राज्यांच्या बैठकीत दबाव असतानाही मागे हटलो नाही. ज्या खुर्चीवर बसलो, त्याची शान राखली, असे त्यांनी सांगितले.
प्रा. राजेंद्र केरकर म्हणाले, 'म्हादई वाचविण्यासाठी आणि व्याघ्र क्षेत्र जाहीर करण्याच्या मागणीसाठी पेडणे तालुक्यातील कोरगाव या भागातून यात्रा सुरू होते, ही एक आनंदाची बाब आहे. पार्सेकर हे मुख्यमंत्री असताना काही निर्णय महत्त्वाचे झाले होते. त्यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे व्याघ्र क्षेत्र जाहीर करणे. म्हादई वाचविण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय होता. गोव्यात व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याचाही निर्णय पार्सेकर यांनी घेतला होता. त्याचा पाठपुरावा निदान नवीन सरकारने करण्याची गरज होती. ते अजून झाले नाही. म्हादई नदी वाचविण्यासाठी आता संघटित होण्याची गरज आहे.'
माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर म्हणाले, व्याघ्र क्षेत्र आणि म्हादई वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी, हितचिंतक आणि पेडणे तालुका नागरिक समितीने जी मोहीम राबविलेली आहे त्या मोहिमेला पूर्ण राज्यातून पाठिंबा आहे.
कोरगावचे सरपंच समीर भाटलेकर यांनी, आज पाण्यासाठी आम्हाला वणवण करावी लागत आहे. म्हादई वाचविली नाही, तर ही स्थिती अधिक बिकट होईल, असे सांगितले. राजन घाटे यांनी सांगितले की, म्हादई नदी वाचली तर आम्ही वाचणार आहोत. त्यासाठी आता व्याघ्र क्षेत्र जाहीर करून सरकारने दिलासा द्यावा व्याघ्र क्षेत्र जर जाहीर झाले तर आपोआप म्हादई नदी वाचणार आहे. सर्व ४० आमदारांनी यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. पेडणे तालुका नागरिक समितीचे सदानंद वायंगणकर यांनी निवेदन दिल्यानंतर पेडणे बसस्थानक येथे सभा होणार असल्याचे सांगितले.
तीन राज्यांच्या बैठकीतही नमलो नाही
मी मुख्यमंत्री असताना कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. दोन मोठ्या राज्यांपुढे गोवा छोटे असले तरी, कायद्याची बाजू घेऊन मी म्हादई वाचविण्यासाठी ठाम राहिलो. माझ्यावर दबाव असतानाही कधी तडजोड केली नाही. आता कायद्याची लढाई सुरु आहे. यामध्ये सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र यावे असे पार्सेकर यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"