सात वर्षांत सरकारकडून एकही पैसा घेतला नाही: मंत्री विश्वजित राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 12:23 PM2024-06-20T12:23:03+5:302024-06-20T12:23:37+5:30
सरकारने आपल्यावर एकही रुपया खर्च केला नसल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: व्हीआयपी कल्चर सोडणे ही एकप्रकारची समाजसेवा आहे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सर्मा यांनी व्हीआयपी कल्चर सोडण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, त्याची अंमलबजावणी देशभरात व्हावी, असे मत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले.
सर्मा यांनी व्हीआयपी कल्चर सोडण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. आपण मागील सात वर्षात सरकारकडून विमान तिकीट, वीजबिले, मोबाइल बिलासह अन्य कुठल्याही सुविधेसाठी पैसे घेतलेले नाहीत. आपण सर्व खर्च स्वतःच करतो. वाहनदेखील आपलेय वापरतो. सरकारने आपल्यावर एकही रुपया खर्च केला नसल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, व्हीआयपी कल्चर सोडण्याचा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सर्मा यांनी घेतलेल्या निर्णयाचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर व नावेलीचे आमदार तथा कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी स्वागत केले आहे. आमदार व मंत्री है समाजाचे सेवक आहेत. त्यांनी समाजाप्रती योगदान देणे गरजे आहे. मंत्री व आमदारांना सरकार पगार देते. त्यामुळे त्यातून ते आपला खर्च करू शकतात, असे आमदार आरोलकर यांनी सांगितले.
आमदारांनी खर्च पगारातूनच करावा : तुयेकर
आमदार उल्हास नाईक तुवेकर म्हणाले, की मंत्री व आमदार हेसुध्दा सर्वसामान्य लोक आहेत. त्यामुळे आपला खर्च त्यांनी आपल्या पगारातून करावा, मी कदंब महामंडळाचा अध्यक्ष असलो तरी विमान तिकिटाचा खर्च महामंडळाकडून न घेता स्वतःच करतो. त्यामुळे आसामचे मुख्यमंत्री सर्मा यांचा व्हीआयपी कल्चर सोडण्याचा निर्णय हा स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.