२५ वर्षे त्यांनी पणजीची वाट लावली; मनोहर पर्रीकरांवर बाबूशचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 08:28 AM2024-01-11T08:28:38+5:302024-01-11T08:30:14+5:30
उत्पल पर्रीकर यांनी माझे रिपोर्ट कार्ड मागण्याआधी वडिलांनी २५ वर्षात कशी वाट लावली हे आधी तपासावे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटीचा वाद चालू असतानाच स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यावर प्रथमच तोफ डागताना कडाडून हल्लाबोल केला आहे. पर्रीकर यांनी २५ वर्षे राजधानी शहराची वाट लावली, असा आरोप त्यांनी केला आहे.
बाबूश गंभीर स्वरुपाचे आरोप करताना म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या सल्लागाराने कोट्यवधी रुपये खाल्ले. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी लि.वर एमडी म्हणून पर्रीकरांनीच स्वयंदिप्ता पाल याला आणले. त्याची कोणतीही पात्रता नव्हती. त्यानेही पैसे खाल्ले. लाचारगिरी करणाऱ्यांना एमडी केले. मित्र असलेल्या आयनॉक्सच्या कन्सल्टंटलाच कामे दिली. उत्पल पर्रीकर यांनी माझे रिपोर्ट कार्ड मागण्याआधी वडिलांनी २५ वर्षात कशी वाट लावली हे आधी तपासावे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात ३५ ते ४० वर्षे काम केलेले अनुभवी अभियंते असताना त्यांना बाजुला ठेवून सल्लागार नेमण्याचे सत्र पर्रीकरांनीच सुरु केले. २५ वर्षात सल्लागारांवर जेवढा खर्च केला तेवढ्या पैशात दोन पूल बांधता आले असते, असे बाबूश म्हणाले.
३१ मे डेडलाइन
बाबूश म्हणाले की, स्मार्ट सिटीची कामे लवकर हातावेगळी करण्यावर आता मी भर देणार आहेत. त्यासाठी शहरातील काही रस्ते बंद करावे लागतील. तेही करीन. कामे पूर्ण करण्यासाठी मी ३१ मेपर्यंत डेडलाइन ठेवली आहे. दर दिवशी मी स्वतः कामाचा आढावा घेईन.
वारस आहात म्हणून काही मिळणार नाही
वारसा हक्काने आता काहीही मिळणार नाही. टीका करणाऱ्यांनी माझे रिपोर्ट कार्ड आता नव्हे, पाच वर्षांनी मागावे. मी गेली २२ वर्षे राजकारणात आहे. माझे वडील किंवा आई कोणीही राजकारणात नव्हते. माझा प्रामाणिकपणा लोकांना ठाऊक आहे, असा टोला बाबूश यांनी उत्पलना लगावला.