"आरोग्यमंत्र्यांनी आधी मुख्यमंत्र्यांना कोविड रुग्णालयाचे दर्शन घडवावे"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 09:02 PM2020-08-01T21:02:15+5:302020-08-01T21:02:52+5:30
काँग्रेसची मागणी; मुख्यमंत्र्यांना पदावरून क्वारंटायन करण्याचा प्रयत्न
मडगाव - कोविड हाताळणीत सपशेल अपयशी ठरलेल्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यानी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना सोबत घेऊन मडगावच्या कोविड इस्पितळाला भेट देण्याची धाडस दाखवावे असे आव्हान गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी दिले आहे.
विरोधकाना आपल्यासोबत कोविड इस्पितळात या असे सांगणाऱ्या आरोग्यमंत्र्यानी एकदाही कोविड रुग्णाना दाखल केलेल्या मडगावच्या इएसआय इस्पितळाला आजपर्यंत भेट दिलेली नाही. आपण कोविड इस्पितळात नियमीत जातो म्हणणारे विश्वजीत राणे आपले राजकीय इस्पित साध्य करण्यासाठी कोविड देखरेख केंद्रात भेटीसाठी जातात म्हणुन सांगुन प्रत्यक्षात माजी मंत्री तथा विद्यमान आमदारांच्या घरी भेट देतात व मुख्यमंत्र्याना त्यांच्या पदावरुन काॅरंटायन करण्याचा प्रयत्न करतात हे जनतेसमोर उघड झाले आहे.
भाजपचे आमदार क्लाफासियो डायस यानी कोविड इस्पितळाऐवजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातच उपचार घेण्याचे पसंत केल्याने मडगावच्या कोविड इस्पितळाचा बोजवारा उडाल्याचे सिद्ध झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
गोवा सरकार कोविड हाताळणीत पुर्णपणे अपयशी ठरले असुन, अव्यवस्था व अनास्थेमुळे मडगावच्या इएसआय इस्पितळात डाॅक्टर, कर्मचारी व रुग्ण यांच्या मनात असंतोष खदखदत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यानी चार दिवसांमागे मडगावात येऊन कोविड इस्पितळाला भेट न देताच पळ काढला असा दावा गिरीश चोडणकर यानी केला आहे.
कोविड रुग्णांना पंचतारांकीत सेवा व सुविधा सरकार देऊ शकत नाही असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यानी त्यांच्या डिफेक्टीव्ह कारभारामुळे रुग्ण, वैद्यकिय पथक व इतर कर्मचारी याना मुलभूत सुविधाच उपलब्ध होत नसल्याचे ध्यानात ठेवावे. सरकार निर्मीत गंभीर परिस्थीतीमुळेच डाॅ. एडविन गोम्स यांच्या पत्नीला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले हे डाॅ. प्रमोद सावंतानी लक्षात घ्यावे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यानी कोविड संकटकाळात लुटमार चालवली असुन, कमिशन ते एकटेच खात असल्याने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे पटत नाही असा दावा गिरीश चोडणकर यानी केला आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यानी सदर इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित करणे तसेच वरचे दोन मजले का रिकामे ठेवले आहेत यावर भाष्य केले नाही यावरुन सरकारचा छूपा अजेंडा असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजप सरकारने गोव्याला आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर केले असुन, आता जनतेच्या आरोग्याशी खेळ करुन मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री राज्याला "कोविड डेस्टीनेशन"चा दर्जा देतील असा दावा गिरीश चोडणकर यानी केला आहे.